दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसराच पेपर, विद्यापीठाचा परीक्षेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 06:08 IST2025-01-16T06:08:39+5:302025-01-16T06:08:59+5:30
एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना दोन वेगळ्या प्रश्नपत्रिका

दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसराच पेपर, विद्यापीठाचा परीक्षेत गोंधळ
- अमर शैला
मुंबई : मुंबई विद्यापीठाने परीक्षेत विद्यार्थ्यांना भलताच पेपर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या सीडीओईच्या मराठी विषयाच्या काही विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या नियमित अभ्यासक्रमाचा पेपर देऊन विद्यापीठाने नवीन गोंधळ घातला आहे. त्यातून एकाच अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या आणि वर्गात एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळे पेपर सोडविला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. सीडीओईच्या दूरस्थ पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या एमए मराठी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी साहित्यशास्त्र १ या विषयाचा पेपर होता. त्यातील २० विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा केंद्र मिळाले होते. यातील १० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातच त्याच दिवशी मराठी विभागाच्या एमए मराठी या विषयाच्या पूर्णवेळ आणि नियमित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही साहित्यशास्त्र या विषयाचा पेपर होता. त्यांचेही परीक्षा केंद्र विद्यापीठातच होते.
दोन्हींचे प्रश्नपत्रिकांचे कोड वेगवेगळे
नियमित आणि दूरस्थ हे दोन्ही अभ्यासक्रम सारखेच असल्याने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला खरा, मात्र परीक्षा संपल्यावर दुसऱ्या केंद्रावरील विद्यार्थ्यांना परीक्षेत भलतेच प्रश्न आल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता दोन्हींचे कोड वेगवेगळे असल्याचे दिसले, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. पर्यवेक्षकांनी पेपर कोड आणि हॉलतिकीटवरील पेपर कोड नीट न तपासल्याने चुकीचा पेपर दिला गेल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
प्रश्नपत्रिका वेगळी, अभ्यासक्रम सारखा
मुंबई विद्यापीठाने मराठी विभागाच्या एमए मराठी नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला पेपर सीडीओईच्या विद्यार्थ्यांना दिला, तर सीडीओईच्या अन्य केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरा म्हणजेच सीडीओईने तयार केलेला पेपर दिला. त्यामुळे एकाच वर्गातील दोन वेगवेगळी परीक्षा केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळे पेपर सोडवले. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा दिलेल्या १० विद्यार्थ्यांना दिलेल्या पेपरचा प्रश्नपत्रिका कोड आणि विषय कोड वेगळे होते. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका संबंधित विषयांच्या प्राध्यापकांनी तपासली. तपासणीत दोन्ही विद्यार्थ्यांना देण्यात आलेलेप्रश्न वेगळे असले तरी त्यांच्या अभ्यासक्रम सारखा होता. तसेच त्याची काठिण्य पातळी सारखी आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान झाले नाही, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण विभागाच्या मराठीच्या परीक्षेत एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळे पेपर मिळणे हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. विद्यापीठाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- राहुल राजोरीआ, प्रदेशमंत्री, अभाविप कोकण प्रांत