‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:38 IST2025-05-18T15:37:57+5:302025-05-18T15:38:04+5:30
जुलै ते सप्टेंबर महिन्यातील तारखा वाटपातील अन्यायाला वाचा फोडत, तसेच नाट्यगृहाच्या जाचक अटींविरोधात अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहिले आहे...

‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र
मुंबई : विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील तिमाही तारखांच्या वाटपाबाबत निर्माते नाराज झाले आहेत. जुलै ते सप्टेंबर महिन्यातील तारखा वाटपातील अन्यायाला वाचा फोडत, तसेच नाट्यगृहाच्या जाचक अटींविरोधात अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहिले आहे.
सध्या मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अष्टविनायकची भूमिका, आज्जी बाई जोरात, वजनदार, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आणि तोडी मिल फँटसी ही पाच नाटके सुरू आहेत. असे असूनही दीनानाथ नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील तारखांचे वाटप करताना रविवार दुपारचा एकही प्रयोग आपल्या संस्थेला दिला नसल्याचा आरोप दिलीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. आपल्या संस्थेला शुक्रवार आणि शनिवारी दुपारी प्रयोग मिळाले, पण रविवार दुपारी एकही प्रयोगाची तारीख मिळालेली नाही. रविवार दुपारचा प्रयोग महत्त्वाचा असतो. तीन महिन्यांतील रविवार दुपारचे प्रयोग कोणत्या संस्थांना दिले आहेत हे जाहीर करण्याची मागणीही जाधव यांनी केली. याबाबत नाट्यगृहाचे व्यवस्थापक भरत पवार यांच्याशी संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारची माहिती देण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे पत्रात?
दिलीप जाधव यांनी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या लेटरहेडवर मुंबई महापालिका उपायुक्त अजितकुमार अंबी यांना लिहिलेल्या पत्रात नव्याने येणाऱ्या व्यवस्थापनाकडून जाचक नियम केले जातात असे म्हटले आहे. सकाळ, दुपार आणि रात्रीच्या सत्रात होणारा कार्यक्रम पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत संपला नाही तर पुढील प्रत्येक अर्ध्या तासासाठी १००० रुपये दंड आकारला जाईल, असा नियम केला आहे.
नाटक ही जिवंत कला असल्याने कित्येकदा उशीर होतो. कोणीही मुद्दाम उशीर करत नाही. त्यामुळे नाटकांना सूट देण्याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले आहे.