शिवडीमध्ये शिंदेसेनेत नाराजी; कोकीळ, आंबोले यांना पक्षांतर्गत विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:51 IST2026-01-02T13:51:26+5:302026-01-02T13:51:42+5:30
२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी एकसंध शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा पूर्वीचा प्रभाग क्र. २०३ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांची पत्नी तेजस्विनी यांना भाजपमधून उमेदवारी मिळवून दिली.

शिवडीमध्ये शिंदेसेनेत नाराजी; कोकीळ, आंबोले यांना पक्षांतर्गत विरोध
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवडी विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात आलेले माजी नगरसेवक नाना आंबोले व पक्षात आल्यानंतर लगेच उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेले अनिल कोकीळ यांच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी काम न करण्याचा निर्णय शिंदेसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी एकसंध शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा पूर्वीचा प्रभाग क्र. २०३ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांची पत्नी तेजस्विनी यांना भाजपमधून उमेदवारी मिळवून दिली.
सतत बाहेरचा उमेदवार
विधानसभेतील पराभवानंतर आंबोले यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आरक्षणामध्ये पुन्हा त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने आंबोले यांना शिंदेसेनेने प्रभाग क्र. २०६ मधून उमेदवारी दिली आहे. मात्र, सतत पक्ष बदलणारा बाहेरचा उमेदवार इथे दिल्याचा आरोप करीत नाराज स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पक्ष नेतृत्व काय तोडगा काढणार?
प्रभाग क्र. २०४ चे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याऐवजी उद्धवसेनेने किरण तावडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोकीळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश करून तावडे यांच्याविरोधात उमेदवारी मिळविली.
मात्र, त्यांच्याही पक्षप्रवेशावरून लालबाग, परळ येथील शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नाराजीवर पक्ष नेतृत्व कसा तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या सिंधू मसूरकर यांनी त्यांचा पराभव केला होता, तर २०२४ च्या विधानसभेत भाजप, शिंदेसेना युतीने मनसेचे बाळा नांदगावकर यांना शिवडीत पाठिंबा दिला होता. त्यामुळे आंबोलेंनी अपक्ष अर्ज भरला होता.