उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:35 IST2025-04-25T09:35:36+5:302025-04-25T09:35:59+5:30

३० टक्के नालेसफाई पूर्ण, दादर, धारावी नाल्याची गगराणी यांनी गुरुवारी पाहणी केली.  

Dispose of the extracted sludge within 48 hours; BMC Municipal Commissioner's instructions | उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांमध्ये निश्चित केलेल्या स्थळावर विल्हेवाट लावावी. त्याचबरोबर पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले आहेत. 

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून सध्या मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर, धारावी नाल्याची गगराणी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लहान-मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्यासाठी महापालिका २३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के काम झाले आहे. पावसाळा सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना आहे. त्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे काम सुरू आहे. उर्वरित सव्वा  महिन्यात गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील, असे गगराणी यांनी सांगितले.

‘एआय’मुळे पारदर्शकता
गाळ उपसा, त्याचे मोजमाप, वाहतूक, विल्हेवाट यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफितींचे प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. पहिल्यांदाच या प्रणालीचा वापर होत असून, त्यामुळे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे, यासाठी प्रशासनाला मदत होत आहे.

Web Title: Dispose of the extracted sludge within 48 hours; BMC Municipal Commissioner's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.