वियोग, स्थलांतर, स्मृतीवर आधारित ‘विस्थापन’; ‘जहांगीर’ गॅलरीत प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:19 IST2025-10-15T10:19:09+5:302025-10-15T10:19:24+5:30
साहनींच्या चित्रांतील पात्रे दुराव्याच्या अवस्थेत असूनही जिवंत जाणवतात. जणू सामायिक वेदनेतून नवे समुदायबंध निर्माण करतात.

वियोग, स्थलांतर, स्मृतीवर आधारित ‘विस्थापन’; ‘जहांगीर’ गॅलरीत प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वियोग, स्थलांतर आणि स्मृती यांच्या गूढ संगमाचा शोध घेणाऱ्या कलाकृतींचे ‘विस्थापन’ हे एकल चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. चित्रकार विश्वा साहनी यांनी साकारलेल्या नव्या संवेदनांचा अनुभव देणारे तैल रंगातील प्रदर्शन २० ऑक्टोबरपर्यंत कलाप्रेमींसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
साहनींच्या चित्रांतील पात्रे दुराव्याच्या अवस्थेत असूनही जिवंत जाणवतात. जणू सामायिक वेदनेतून नवे समुदायबंध निर्माण करतात. विस्थापन आणि हरवलेपण यांच्या अनुभवांतून ते मानवी आत्म्याची सहनशक्ती, ओढ आणि प्रेमाची सातत्यपूर्ण धारा व्यक्त करतात. साहनी यांच्या कलाकृतीविषयी कला समीक्षक राखी अरदकर म्हणाल्या की, या कलाकृती वियोग, स्थलांतर, स्मृती यांच्या गूढ संगमाचा शोध घेतात.
मानवी अस्तित्वाचे खोल थरांवर भाष्य
मुंबईत स्थायिक झालेले साहनी आपल्या स्थलांतर प्रवासातील ओढ, आकांक्षा आणि जुळवून घेण्याची प्रक्रिया आपल्या कलेतून मांडतात.
धुक्याच्या आच्छादनातून उलगडणारी त्यांची चित्रे मानवी अस्तित्वाच्या खोल थरांवर भाष्य करतात. जिथे वियोग हा शेवट नसून, नव्या नात्यांच्या आणि नव्या ओळखींच्या शोधाची सुरुवात ठरते.
ओळख, प्रत्येक रंगाची...
विश्वा साहनी म्हणाले की, विस्थापनाच्या तत्त्वज्ञानात मी अनेक रंग पाहिले आहेत. प्रत्येक रंगाचा स्वतःचा वेगळा अर्थ आणि प्रभाव असतो. पण जेव्हा एक रंग दुसऱ्यात विस्थापित होतो, तेव्हा तो आपले अस्तित्व गमावतो.
काही रंग मात्र असे असतात की, ते विस्थापित होऊनही आपली नवी ओळख निर्माण करतात. आपले आयुष्यही असेच आहे. विस्थापनात आपण कधी आपले अस्तित्व हरवतो, तर कधी नव्या रूपात पुन्हा जन्म घेतो.