Disha Salian Case Mumbai High Court Hearing: गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणी काय झाले, याबाबत वकील निलेश ओझा यांनी पत्रकारांना माहिती दिली.
सतीश सालियन यांनी या प्रकरणाची पूर्णपणे नव्याने चौकशी करण्याची मागणी याचिकेमध्ये केली आहे. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.
उच्च न्यायालयातील सुनावणीत काय झाले?
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी उच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या प्रकरणाची सुनावणी चुकून न्यायमूर्ती डेरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर लावण्यात आली होती. न्यायालयात नमूद केले की, हा खटला तुमच्याकडे नाही. महिलेविरोधातील गुन्ह्याचे हे प्रकरण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे जायला पाहिजे. आता सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होईल. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीस परवानगी दिली आहे. खटल्याची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी यासाठी विनंती करू, असे निलेश ओझा यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट बोगस होता, असा दावा करत पोलिसांनी हा रिपोर्ट परत घेत याप्रकरणी तपास सुरू केला असल्याचे ओझा यांनी सांगितले. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे नव्याने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पुरावे बदलण्याची शक्यता आहे. तसेच, ओझा यांनी न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे.