Disha Salian Case: गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणाची पूर्णपणे नव्याने चौकशी करण्याची मागणी याचिकेमध्ये केली आहे. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला. या प्रकरणाच्या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयाने सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंद झाली होती. तपासाअंती ते प्रकरण बंद करण्यात आले. तथापि, आता दिशाच्या कुटुंबीयांनीच याचिका केली आहे. त्यामुळे, या सगळ्या बाबी पाहाव्या लागतील. त्यामुळे, या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ हवा आहे, असे सरकारच्या वतीने उपस्थित वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही त्यांचे म्हणणे मान्य करून सरकारला सालियन यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.
याचिकाकर्त्यांना तातडीने सुनावणी हवी असल्यास...
याचिकाकर्त्यांना तातडीने सुनावणी हवी असल्यास ते उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे दाद मागू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून अटक करण्याची प्रमुख मागणी सतीश सालियान यांनी केली आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती आणि माजी मुख्य न्यायमूर्ती यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अवमानाची कारवाई का करू नये? याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या वडील सतीश सालियन यांची बाजू मांडणारे वकील नीलेश ओझा यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली.