Join us

दिशा सालीयन प्रकरण: शवविच्छेदनासाठी पाठवलेला मृतदेह 'न्यूड' च असतो ! डॉ शैलेश मोहिते यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 17:36 IST

शवविच्छेदन करण्यापूर्वी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या पंचनाम्यासाठी मृतदेहाला विवस्त्र करावेच लागते अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - शवविच्छेदन अहवालामध्ये दिशा सालीयन (२८) च्या मृत्यूपूर्वी तिच्यासोबत काही गैर घडल्याची शंका तिच्या शवविच्छेदन अहवालात उल्लेख करण्यात आलेल्या 'न्यूड बॉडी' या शब्दामुळे व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन करण्यापूर्वी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या पंचनाम्यासाठी मृतदेहाला विवस्त्र करावेच लागते अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान मालवणी पोलिसांकडून पुन्हा सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ शैलेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही संशयित मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी पोलीस पंचनामा करतात. या पंचनाम्यादरम्यान स्त्री असो अथवा पुरुष त्यांच्या अंगावरील तसेच अंतर्गत किंवा गुप्तांगावरील जखमा, रक्तस्राव पाहण्यासाठी, अंतवस्त्रावर काही डाग वगैरे आहेत का हे पडताळणीसाठी मृतदेहाला विवस्त्र करावेच लागते. तसेच पुन्हा त्या मृतदेहाला कपडे घालणे हे देखील कठीण असते. त्यामुळे बेडशीट किंवा सफेद कपड्यात गुंडाळून तो मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येतो. त्यामुळे कोणताही मृतदेह हा विवस्त्रच असतो, असे डॉ मोहिते यांचे म्हणणे आहे. तर शवविच्छेदन अहवालादरम्यान मृतदेह कपड्यात लपेटलेला असा उल्लेख करण्यात डॉक्टरकडून राहून गेले असावे त्यामुळे हा सर्व गोंधळ झाल्याची शक्यता अन्य एका तज्ज्ञाकडून वर्तवली गेली आहे.मात्र एखादा मृतदेह नेमक्या कोणत्या अवस्थेत सापडला याची पहिली नोंद ही पंचनाम्यात केली जाते. त्यामुळे पंचनाम्यात त्या मृतदेहाची स्थिती कशी होती यावरून आपल्याला खरी स्थिती लक्षात येऊ शकते असेही डॉ मोहिते यांनी नमूद केले. त्यानुसार दिशाप्रकरणात पंचनाम्याबाबत मालवणी पोलिसांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. दरम्यान दिशा ज्या इमारतीवरुन पडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज अधिक खोलवर जाऊन पोलिसांनी पडताळण्यास सुरवात केली आहे. मात्र अद्याप तरी कोणतीही सेलेब्रिटी किंवा राजकारणी त्यात सहभागी झाल्याचे उघड झालेले नाही.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई