चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

By यदू जोशी | Updated: June 26, 2025 06:31 IST2025-06-26T06:30:21+5:302025-06-26T06:31:00+5:30

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी खर्चाचे माध्यमांनी दिलेले आकडे वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे स्पष्ट केले.

Discussion about meals not served on silver platters is intense; allegations and counter-allegations abound | चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

- यदु जोशी, मुंबई
विधानभवनात आयोजित दोन दिवसांच्या अंदाज समिती परिषदेत चांदीच्या ताटात जेवणच दिले गेले नाही; पण त्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात फारच रंगली. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठला.

संसद आणि विविध राज्यांमधील अंदाज समित्यांची ही परिषद २३ आणि २४ जून रोजी विधानभवनात झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध राज्यांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष परिषदेला हजर होते. 

विधानभवनातच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी चांदीच्या ताटात सहाशे प्रतिनिधींना जेवण दिले गेल्याची बातमी पसरली आणि विधानभवन टीकेच्या फेऱ्यात सापडले. मात्र, प्रत्यक्षात ती ताटे चांदीची नव्हतीच, अशी बाब आता समोर आली आहे. 

चांदीच्या एका ताटाची किंमत बाजारात किमान दोन लाख रुपये इतकी आहे. कॅटरर्स चांदीची म्हणून जी ताटे वापरतात, ती प्रत्यक्षात चांदीची नसतातच. ती व्हाइट मेटलची ताटे असतात. 

याबाबत निखिल कॅटरर्सचे मालक सुनील टिपणीस यांनी सांगितले की, ती ताटे चांदीची नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात चांदीची महागडी ताटे आणणे आम्हाला परवडत नाही; म्हणून आम्ही व्हाईट मेटलची ताटे भाड्याने घेत असतो. एका ताटाचे भाडे साधारणत: १०० ते १५० रुपये असते. बाजारात हे ताट दोन-अडीच हजार रुपयांना एका याप्रमाणे विकत मिळते. वाट्याही व्हाईट मेटलच्याच असतात. एका ताटाचे ५०० रुपये भाडे दिले ही वस्तुस्थिती नाही. एका थाळीचा दर ४ हजार रुपये नव्हता, निम्म्यावर होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी खर्चाचे माध्यमांनी दिलेले आकडे वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे स्पष्ट केले.

उधळपट्टी असल्याची टीका

चांदीच्या ताटातच जेवण दिल्याचा दावा करत उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. ही पैशांची उधळपट्टी असल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘जनतेला लुटायला बसलेल्या सरकारकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय?’ असा सवाल केला.

Web Title: Discussion about meals not served on silver platters is intense; allegations and counter-allegations abound