पालिकेतील बदल्यांमुळे नाराजी, अभियंता संघटना, नागरिकांचा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 05:31 IST2025-03-31T05:31:20+5:302025-03-31T05:31:59+5:30
Mumbai Municipal Corporation: पालिकेतील सात उपायुक्त, तसेच १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काही सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिला आहे. दरम्यान, काही धाडसी व अल्पावधीत ठसा उमटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालिकेतील बदल्यांमुळे नाराजी, अभियंता संघटना, नागरिकांचा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आक्षेप
मुंबई - पालिकेतील सात उपायुक्त, तसेच १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काही सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिला आहे. दरम्यान, काही धाडसी व अल्पावधीत ठसा उमटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी प्रशासनात खांदेपालट केली आहे. त्यात दीड महिन्यापूर्वी ‘एफ उत्तर’ विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती केलेल्या नितीन शुक्ला यांची ‘बी’ विभागात बदली केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच घेतलेल्या सहायक आयुक्त पदाच्या परीक्षेत शुक्ला हे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर ते पालिकेत रुजू झाले होते. त्यांनी ‘एफ उत्तर’ विभागातील पदपथ बेकायदा फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त केला होता. त्यामुळे दादर-माटुंगा परिसरातील नागरिकांनी त्यांची प्रशंसा केली होती.
बढती मिळालेले अधिकारी
शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) – उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) ( माहिती तंत्रज्ञान विभाग) (प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था). अजित आंबी, सहा. आयुक्त (जी उत्तर विभाग) – उपायुक्त (उद्याने). पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा, मलनि:सारण) – उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते). विश्वास मोटे, सहा. आयुक्त (एम पश्चिम विभाग) – उपायुक्त (परि. ३)
निर्णय रद्द करा
सहायक आयुक्त शुक्ला यांच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी आयुक्तांनी त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
कोणाच्या कुठे बदल्या?
विश्वास शंकरवार, सहआयुक्त (परिमंडळ ४) – सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) (संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष)
डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ७) – उपायुक्त (परिमंडळ ४)
संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) -(प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था) – उपायुक्त (परिमंडळ ७)
विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) – सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) (सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे)
मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (डी विभाग) ( सहायक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार)
अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (एस विभाग)
नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) - सहायक आयुक्त (बी विभाग)