उमेदवारी नाकारल्याने उपनगरात इच्छुकांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:57 IST2025-12-30T14:57:27+5:302025-12-30T14:57:47+5:30
मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे...

उमेदवारी नाकारल्याने उपनगरात इच्छुकांमध्ये नाराजी
मनोहर कुंभेजकर -
मुंबई : महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे.
प्रभाग क्र. ६० मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे निवडून आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र ही जागा भाजपला सोडल्याने शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवार खोपडे आणि वर्सोव्याचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर नाराज झाले आहेत. प्रभाग क्रमांक ६३ च्या भाजपच्या माजी नगरसेविका रंजना पाटील यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापल्याने त्यासुद्धा नाराज आहेत. सर्व्हेत माझे नाव होते, रविवारी सकाळपर्यंत तुमचे नाव आहे, तुम्हाला एबी फॉर्म दिला जाईल असे सांगण्यात आले. मात्र तिकीट न मिळाल्याने माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी मंगळवारी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रभाग ९९ ची जागा भाजपच्या वाट्याला
प्रभाग क्रमांक ९९ मधून संजय अगलदारे दोन वेळा निवडून आले होते. ते सध्या शिंदेसेनेत आहेत. मात्र, शिंदेसेनेची जागा भाजपला गेल्याने उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे समर्थक जितेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्याचे निश्चित आहे. त्यामुळे अगलदारे व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
प्रभाग क्रमांक ९ च्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना थेट प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपने तिकीट दिल्याने येथील इच्छुकांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक २७ मध्ये तिकीट नाकारल्याने भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी लढणार, मी मोडणार, पण मी कधीच थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आमदार कन्येला संधी नाही
दहिसरच्या भाजप आ. मनीषा चौधरी यांची कन्या अंकिता चौधरी यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र, अंकिता यांना तिकीट मिळाले नाही.
मुंबईत महायुतीचा महापौर आणि दहिसरमधून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. चौधरी यांनी सांगितले.