कार्यालयीन वेळा बदलल्याने पुणे-मुंबई प्रवाशांची गैरसोय; कर्मचाऱ्यांवर लेटमार्कची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:31 IST2020-03-09T01:54:45+5:302020-03-09T06:31:05+5:30
पुण्याहून दररोज मंत्रालय, मुंबई पालिका तसेच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे.

कार्यालयीन वेळा बदलल्याने पुणे-मुंबई प्रवाशांची गैरसोय; कर्मचाऱ्यांवर लेटमार्कची टांगती तलवार
पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करत कार्यालयांच्या वेळा बदलल्या. पण या वेळेत कार्यालयात पोहोचण्यासाठी सोयीच्या गाड्या नसल्याने नोकरदारांची तारांबळ उडत आहे. गेली कित्येक वर्षे पुण्याहून मुंबईला जाताना वेळेत रेल्वे नसल्याने ‘लेटमार्क’ची टांगती तलवार आहे.
तसेच सायंकाळच्या वेळी एकही इंटरसिटी नसल्याने नोकरदारवर्गाची तारांबळ उडत आहे. त्यामुळे किमान एका इंटरसिटी गाडीची वेळ बदलून कार्यालयीन वेळेत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुण्याहून दररोज मंत्रालय, मुंबई पालिका तसेच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. बुहतेक जण सिंहगड एक्स्प्रेस किंवा डेक्कन क्वीनने मुंबईला जातात. राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. हे करताना कार्यालयांच्या वेळा सकाळी १० ऐवजी ९.४५ व सायंकाळी ५.४५ ऐवजी ६.१५ केल्या आहेत. त्यामुळे नोकरदारांची गैरसोय होऊ लागली आहे. सिंहगड एक्स्प्रेस सकाळी ६.०५ वाजता पुण्याहून निघून ९.५० ते १०.१५ पर्यंत पोहोचते. डेक्कन क्वीनला पुण्यातून सकाळी ७.१५ वाजता निघाल्यानंतर मुंबईत पोहोचायला १०.३० वाजतात. आता १५ मिनिटांनी वेळ अलीकडे घेतल्याने नोकरदारांना धावपळ करावी लागत आहे. हीच स्थिती सायंकाळी कार्यालयातून निघाल्यानंतरही होते. डेक्कन क्वीन ५.१० ला तर सह्णाद्री ५.५० ला पुण्याकडे रवाना होते. दोन्ही गाड्यांच्या वेळा कार्यालयांच्या वेळेशी जुळत नाहीत.
पुण्यातून सकाळी सुटणारी सिंहगड एक्स्प्रेस सुपरफास्ट केल्यास ती तीन तासांत मुंबईत पोहोचेल. येताना सह्याद्री एक्स्प्रेस सायंकाळी ६.४५ किंवा ७ ची करावी. सायंकाळी एक्स्प्रेसमध्ये पासधारकांना परवानगी देऊन एक स्वतंत्र डबा जोडावा. - हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप