दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क; दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्वसमावेशक महाराष्ट्र ‘व्हिजन डाॅक्युमेंट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:40 IST2025-10-16T08:40:00+5:302025-10-16T08:40:14+5:30
सर्वसमावेशक महाराष्ट्रअंतर्गत सरकारने दिव्यांगांसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, प्रत्येकास प्रतिष्ठा, स्वायत्तता व समान हक्क मिळावेत याकरिता काम केले जाईल.

दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क; दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्वसमावेशक महाराष्ट्र ‘व्हिजन डाॅक्युमेंट’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनिमय केंद्रे तयार करतानाच समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणीही होईल. सरकारच्या मंजुरीनंतर सुरू होणारे हे महाराष्ट्र ‘व्हिजन डाॅक्युमेंट’ उर्वरित राज्यांनाही दिशादर्शक ठरेल.
सर्वसमावेशक महाराष्ट्रअंतर्गत सरकारने दिव्यांगांसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, प्रत्येकास प्रतिष्ठा, स्वायत्तता व समान हक्क मिळावेत याकरिता काम केले जाईल. दिव्यांगांना संपूर्ण क्षमतेसह सिद्ध करता यावे यासाठी विभाग काम करेल. शाळा सोडलेली मुले व उशिरा दिव्यांगत्व ओळखल्या गेलेल्या मुलांना आधार मिळावा म्हणून पर्यायी शैक्षणिक प्रणाली व सेतू अभ्यासक्रम राबविला जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी धोरण तयार केले जाईल, असे दिव्यांग कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
विविध पुनर्वसन उपक्रमांची आखणी
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी म्हणून फिजिओथेरपी, समुपदेशन, वाचा उपचार अशा पुनर्वसन उपक्रमांची आखणी केली जाईल.
डिजिटल माध्यमांचा वापर करून दिव्यांग खेळाडूंची कामगिरी अधोरेखित केली जाईल. ओटीटी प्लॅटफॉर्म, दूरचित्रवाणी व चित्रपटांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सुसंगत लाभ मिळतील या दृष्टीने काम केले जाईल.
शैक्षणिक व संशोधन संस्थांशी सहयोग करून दिव्यांग, सक्षमीकरण, कल्याणावर आधारित माहिती गोळा केली जाणार आहे.
दिव्यांगांना नवी दिशा
सर्वसमावेशक शिक्षण, सुगम्य पायाभूत सुविधा, अर्थपूर्ण रोजगार देणे. कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करणे.
जनजागृतीसोबत हक्कांचे संरक्षण करणे. संरक्षण, संधी आणि सहायक प्रणाली मजबूत करून दिव्यांग जनांना स्वतंत्र सुरक्षित समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे. संशोधनावर आधारित व नावीन्यपूर्ण संकल्पनांद्वारे उद्दिष्ट निश्चित करून अंमलबजावणी केली जाणार आहे.
शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रासोबत कार्यस्थळांवर सोयीसुविधा देण्याचे काम केले जाईल.
संस्थांना पाठबळ, सामाजिक सुरक्षा बळकट करणार
दिव्यांगांच्या हक्कासाठी कार्यरत संस्थांना पाठबळ दिले जाईल. हक्क व सेवांची माहिती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. दिव्यांग व्यक्तींना राजकीय व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा, सार्वजनिक पदांसाठी उमेदवारी करता यावी म्हणून प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळासोबत काम करत दिव्यांगांची सामाजिक सुरक्षा बळकट केली जाईल.
दिव्यांगांचा विकास म्हटल्यावर केवळ शाळा, महाविद्यालये डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र, आता दिव्यांग कल्याण विभागाने समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला आहे. विभागाची दृष्टी व्यापक असून, ध्येय व उद्दिष्ट निश्चित केली आहेत. या सगळ्यातून धोरण निश्चित करत दिव्यांगांचा सर्वसमावेशक विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
- तुकाराम मुंढे,
सचिव, दिव्यांग कल्याण विभाग