Join us  

रानगव्याच्या मृत्यूनंतर 'वळू'च्या दिग्दर्शकानं व्यक्त केला संताप 

By महेश गलांडे | Published: December 10, 2020 8:54 AM

साधारण 12 वर्षांपूर्वीच गिरीश कुलकर्णी यांनी वळू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. गावातील वळूला पकडण्यासाठी गावकऱ्यांची आणि वनविभागाची उडालेली धांदल या चित्रपटातून त्यांनी साकारली होती.

ठळक मुद्देसाधारण 12 वर्षांपूर्वीच गिरीश कुलकर्णी यांनी वळू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. गावातील वळूला पकडण्यासाठी गावकऱ्यांची आणि वनविभागाची उडालेली धांदल या चित्रपटातून त्यांनी साकारली होती.

मुंबई - पुण्याच्या कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर, वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला. रानगवा मेल्यानंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, वळू चित्रपट फेम दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी अतिशय भावूक आणि उद्ग्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. 

साधारण 12 वर्षांपूर्वीच गिरीश कुलकर्णी यांनी वळू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. गावातील वळूला पकडण्यासाठी गावकऱ्यांची आणि वनविभागाची उडालेली धांदल या चित्रपटातून त्यांनी साकारली होती. पुण्यातील रानगव्याच्या घटनेनं अनेकांना वळू चित्रपटाची आठवण झाली. त्यातूनच, गिरीश कुलकर्णी यांनी पुण्यातील घटनेवर मानवाला विचार करायला भाग पाडणारी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश कुलकर्णी यांनी रानगव्याच्या मृत्युनंतर शोक व्यक्त करत मानवाने संवेदनशील व्हायला हवे, अशी भावूक प्रतिक्रिया दिलीय. एखादा माणूस रस्ता चुकून गावात आला, लहान मूल घर चुकून आजुबाजूला गेलं, तर आपण लगेच त्याची शोधाशोध करुन त्याला रस्ता दाखवतो, त्याला त्याच्या घरी सोडतो. त्यामुळे, चुकलेला प्राणी जर आपल्याकडं आला तर त्याला कशी वागणूक द्यावी याबाबतही माणसानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. 

आपण हिंस्त्र होत चाललो आहोत, आपल्या कुतूहलापोटी, आपल्या उत्सुकतेपोटी, आपल्या हव्यासापोटी आपण हिंस्त्र होत आहोत. लोकांनी गर्दी केली आणि रानगव्याला पळवलं. गवाच काय माणूसही सध्या घाबरलेला आहे, भयावह वर्तमान आहे. शहर माणसाला भिती घालतं, दडपून टाकत. माणसाची ही कहाणी आहे, मग मुक्या जंगली प्राण्याचं काय चालेल, असेही कुलकर्णी यांनी म्हटलं. अशा परिस्थितीत रानगवा मेला याचं नवल नाही, उलट तो मेला म्हणून सुटला असं म्हणावं लागेल. नाहीतर आपण कसंही त्याला मारलाच असता, असे उद्गविग्न उद्गागारही कुलकर्णी यांनी काढले. 

"अशा घटना सातत्याने होत असतात. यापुढेही होत राहतील. मानव-बिबट्या संघर्ष आहे, मानव-वाघ संघर्ष आहे, त्यात आता रानगव्याचा समावेश झाला," असंच म्हणू शकतो. "वन्यप्राण्यांचे वंशपरंपरागत मार्ग ठरलेले असतात. त्यांच्या अधिवासाचा कधीच विचार केला जात नाही. त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करतो. त्यांचं अस्तित्व लक्षात घेऊन कामं केली जात नाहीत. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी अतोनात कामं चालू आहेत. या सगळ्यांचा फटका रानगव्याला बसला असेल. कळपातून वाट चुकून लांब आला असेल. त्यात त्याचा जीव गेला.", अशी विचार करायला लावणारी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली. बीबीसी मराठी या वेबसाईटशी बोलताना गिरीश कुलकर्णी यांनी आपला संताप व्यक्त केला. 

सोशल मीडियावर गव्याची चर्चा

बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. गवा चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशनानंतर गव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याचे वृत्त सोशल मीडियात झळकताच, सोशल मीडियातून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. अनेकांनी यावर मिम्सही तयार केले, तर काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली. तर, गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली.  

टॅग्स :पुणेमुंबईमृत्यूप्राण्यांवरील अत्याचारसिनेमा