वाढवण ते पालघरदरम्यान थेट वेगवान मालवाहतूक; पश्चिम रेल्वे मार्गावर २२.२३ किमीला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:47 IST2025-11-06T09:47:18+5:302025-11-06T09:47:55+5:30
हा प्रकल्प देशातील मालवाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे

वाढवण ते पालघरदरम्यान थेट वेगवान मालवाहतूक; पश्चिम रेल्वे मार्गावर २२.२३ किमीला मान्यता
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाढवण पोर्ट-न्यू पालघरदरम्यान सहा रेल्वे रूळ ओलांडून नवीन महावाहतूक सुरू करण्यात येणार आहे. वाढवण बंदराला भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक मार्गिकेशी थेट जोडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच २२.२३ किमीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील रेल्वे रुळ ओलांडतानाचा मार्ग एलिव्हेटेड असेल. हा प्रकल्प देशातील मालवाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
वाढवण येथे देशातील सर्वांत मोठे बंदर उभारण्यात येत आहे. या बंदरात जगातले आतापर्यंतचे सर्वांत मोठे जहाज येऊ शकेल. त्यामुळे परदेशातून थेट भारतात माल येणे शक्य होईल. दरम्यान, या बंदरावर येणाऱ्या मालाची वाहतूक देशभर करण्यासाठी तो रेल्वे मार्गाने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसोबत जोडणे आवश्यक आहे. यासाठी पश्चिम रेल्वे १,४२३.२५ कोटी रुपये इतक्या खर्चाचा प्रकल्प उभारत आहे.या प्रकल्पाची लांबी २२.२३ किमी आहे. तर होल्डींग यार्ड क्षेत्रफळ २.६० किमी आहे. या प्रकल्पाला २३ जुलै २०२५ रोजी मान्यता मिळाली असून ऑक्टोबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
होल्डिंग यार्ड
वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड अंतर्गत २.६० किलोमीटर परिसरात एक आधुनिक होल्डिंग यार्ड बांधले जाईल. या यार्डमुळे बंदराकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मालगाड्यांच्या हाताळणीची सोय होणार आहे. वाढवण पोर्टला रेल्वे मार्गाने जोडल्यामुळे आयात-निर्यात साखळी गतिमान होण्यास मदत होणार असून पालघर परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.
जमीन अधिग्रहण
या प्रकल्पासाठी जमीन संपादन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,
९० टक्के जमीन रेल्वे आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला सुपुर्द केल्यानंतरच बांधकाम निविदा जारी केल्या जातील. पुढील आर्थिक वर्षात या प्रकल्पाची पायाभरणी करता यावी म्हणून सध्या भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे.
प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही...
हा प्रकल्प अस्तित्वातील सहा रेल्वे रूळ ओलांडून थेट डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मालवाहतूक मार्गाशी जोडला जाणार आहे. यासाठी रुळावरून जाणारा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा रेल्वे ओव्हरब्रिज तांत्रिकदृष्ट्या डिझाइन केला गेला आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. गाड्या वेळेवर धावतील आणि स्थानिक रेल्वे वाहतूक अखंडित सुरू राहील.
नवीन रेल्वे मार्गिकेची लांबी : २२.२३ किमी
प्रकल्पाचा खर्च : १४२३.२५ कोटी रुपये
होल्डिंग यार्ड क्षेत्रफळ : २.६० किमी
वाढवण पोर्ट हा देशासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकसित भारताचे व्हिजन साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पश्चिम रेल्वे नवीन रेल्वे मार्गाच्या माध्यमातून वाढवण पोर्ट देशाच्या रेल्वे नेटवर्कसोबत थेट जोडले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या दृष्टीने हा डबल बेनिफिट देणारा प्रकल्प आहे.
-विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे