Join us  

Dipali Sayed: "राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 6:24 PM

राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ 2 तालुक्यापुरतंच आहे

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. युपीतील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी युपीची माफी मागावी, मगच अयोध्या दौरा करावा, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यातच, राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेवर टिका केली आहे. तसेच, राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याला शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरेंसोबत जावे, असा सल्लाही दिला आहे. 

राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ 2 तालुक्यापुरतंच आहे. पण, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा आहे. बाबरी मस्जिद पाडल्याची संपूर्ण जबाबदारी स्वर्गीय बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांचा ते वाक्यही आजही आपल्याला आठवतं, असे म्हणत दिपाली सय्यद यांनी मनसेला खोचक टोला लगावला. 

राज ठाकरेंच्या दौऱ्यादिवशी अयोध्येत दंगल झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?. तुमच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला तर तुम्ही काय करणार आहात. काही दिवसांपूर्वी जे झालं तेव्हा अमित ठाकरे गायब होते, असेही त्यांनी म्हटलं. तसेच, राज ठाकरेंना मनात भीती निर्माण झाली असेल, माफी मागावी की नाही अशी चलबिचल अवस्था असेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंचा हात धरुन अयोध्येला जावे मग उत्तम होईल, असा सल्लाही सय्यद यांनी दिला. 

माझं आधार कार्डही दिपाली सय्यदच

वेगवेगळ्या नावाने निवडणुका लढणाऱ्या दिपाली सय्यद यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला मनसेचे गजानन काळे आणि अखिल चित्रे यांनी लगावला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिपाली सय्यद यांनी माझं नाव लग्नापासून, गेल्या 25 वर्षांपासून दिपाली सय्यदच असल्याचं म्हटलं आहे. मी कधीच निवडणूक लढले नाही. लग्नापासून मी आजही त्यांच्यासोबतच आहे, माझा संसारही चालू आहे. म्हणून, मी दुसऱ्या कुठल्याही नावाने निवडणूक लढत नाही. माझं आधार कार्डसुद्धा दिपाली सय्यद नावानेच आहे, असे स्पष्टीकरण दिपाली सय्यद यांनी दिले. 

शिवसेना नेता हे पद माझ्याकडे

कोणं म्हणतं माझ्याकडे पद नाही. माझ्याकडे शिवसेना नेता हे पद आहे. मी कुठेही जाते तिथं मला शिवसेना नेत्या म्हणूनच ओळखलं जातं, असे म्हणत दिपाली सय्यद यांनी माझ्याकडे विशेष कुठलं पद नसलं तरी, शिवसेना नेता हे पद आहे, असे त्यांनी म्हटलं. मी यापूर्वीची निवडणूक ही शिवसेनेकडूनच लढवली होती, असेही त्यांनी सांगितलं.  

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपुणेशिवसेनादीपाली सय्यद