Join us

दीनानाथ रुग्णालयाची चाैकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:04 IST

Dinanath Mangeshkar Hospital: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 मुंबई/पुणे - पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चौकशी समितीत इतर चार तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

दीनानाथ रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

पुण्यात तीव्र पडसाद : पुणे शहरात शुक्रवारी घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी भाजपसह उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पतित पावन संघटना, विविध पक्ष व संघटनांकडून रुग्णालय परिसरात व धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली. उद्धवसेनेतर्फे धर्मादाय कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. डॉ. सुकृत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली. 

चाैकशी समितीत कोण?दीनानाथ रुग्णालयातील घटनेच्या चौकशी समितीत उपसचिव यमुना जाधव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर विधी व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’ची मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना निर्देश देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :हॉस्पिटलपुणेदेवेंद्र फडणवीस