Join us

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद - जाणून घ्या मुंबईत कुठे, काय परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:49 IST

भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देचेंबूर, गोवंडी येथे रेल रोको झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. राज्य राखीव पोलीस दल आणि 400 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

मुंबई - भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा जोर वाढल्यानंतर मुंबईत शाळा, कॉलेजेस सोडून देण्यात आल्या. आंदोलक थेट रस्त्यावर उतरल्याने काही भागात वाहतूक कोंडी झाली. 

चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.  चेंबूर, गोवंडी येथे रेल रोको झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. काही ठिकाणी बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. चेंबूर, मुलूंड,कुर्ला, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि 400 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

चेंबूर अमर महाल, घाटकोपर इथे दगडफेकीच्या घटना घडल्या. भीमा-कोरेगाव हिंसाचारामुळे अहमदनगर, औरंगाबाद येथे जाणारी बससेवा बंद करण्यात आली.

मुंबईत तणावाची स्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेक कार्यालये लवकर सोडून देण्यात आली. मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ईस्टन एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर या आंदोलनाचा परिणाम झाला. सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्याआधी पोलिसांसकडून सत्य तपासून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.                                                  

 

टॅग्स :भीमा-कोरेगाव