मुंबई : विवाहावेळी धार्मिक विधींना अत्यंत महत्त्व दिले जाते. लग्न करून सहजीवनाला प्रारंभ झाल्यावर केवळ सामाजिक किंवा धार्मिक पद्धतीनेच नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्याही मान्यता मिळण्यासाठी विवाह नोंदणी आवश्यक आहे. अनेकदा नवविवाहित दाम्पत्य विवाह नोंदणीच्या गरजेविषयी अनभिज्ञ असतात. गरज पडल्यावरच त्याची आठवण होते. पासपोर्ट बनवताना, सरकारी नोकरीसाठी, मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी, अशा अनेक प्रसंगांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे ठरते. त्यामुळे विवाह झाल्यानंतर विवाह नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या विवाह नोंदणीचे प्रमाण खूप कमी आहे. बहुतेक दाम्पत्य विवाह नोंदणीच करत नाहीत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक कामांसाठी आवश्यक असते. विवाह नोंदणी न केल्यास, अनेक सरकारी योजना आणि अधिकृत कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोंदणी करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. विवाह कायद्यानुसार जे विवाह करतात, त्यांच्या नोंदणी त्या प्रक्रियेत होते. मात्र, इतरांना नोंदणी करावी लागते.
"आम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्राबद्दल व त्याच्या महत्त्वाबाबत माहिती होती. त्यामुळे आम्ही लग्न झाल्यानंतर वर्षभरात विवाह नोंदणी केली. अनेक ठिकाणी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र नसल्याने कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी आम्ही ही नोंदणी केली"- गौरी क्षीरसागर, अंधेरी
मुंबईत दोन स्वतंत्र कार्यालये मुंबईत शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालये आहेत. विवाह करताना पती व पत्नीचा धर्म वेगवेगळा असेल, तर त्यांना विशेष विवाह कायद्यान्वये विवाह नोंदणी करावी लागते. याठिकाणी २०१० पूर्वीचे विवाह नोंदवले जातात. २०१० नंतरचे विवाह असतील तर महापालिकेकडे नोंदणी करावी लागते. जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबई उपनगर विवाह नोंदणी कार्यालयात ५०४ जणांचे विवाह नोंदविण्यात आले. ज्या नागरिकांचे विवाह झाले आहेत, मात्र नोंदणी झालेली नाही त्यांनी ही नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात धावपळ करण्याची गरज भासणार नाही- संतोष भातंबरेकर, विवाह अधिकारी व विवाह निबंधक, मुंबई उपनगर जिल्हा