Join us  

विधानपरिषद न मिळाल्याने वाईट वाटलं का? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 10:14 PM

पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ गडावर जाता येणार नसल्याचं दु:ख व्यक्त केलंय. आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे.

मुंबई - भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून दरवर्षी लाखो कार्यकर्ते गोपीनाथ गडावर एकत्र येतात. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंसह संपूर्ण मुंडे कुटुंबाची हजेरी असते. तसेच, पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतात. मात्र, देशातील, राज्यातील कोरोनाची अन् लॉकडाऊनची परिस्थिती पाहता यंदाचा पुण्यतिथी कार्यक्रम अतिशय साधेपणाने करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सांगितले. तर, विधानपरिषदेत स्थान न मिळाल्यानं वाईट वाटलं का? या प्रश्नावरही पंकजा यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. 

पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ गडावर जाता येणार नसल्याचं दु:ख व्यक्त केलंय. आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठी या वेबपोर्टलशी बोलताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेच्या आठवणी जागवत इतरही राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी, विधानपरिषदेत संधी न मिळाल्याबद्दही त्यांनी मौन सोडलं. ''मला काही वाईट वगैरे वाटलं नाही किंवा दुख: झालं नाही. राज्यातल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की, तुमचं नाव असल्यामुळे तुमची तयारी असावी. पण जे झालं त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझे कार्यकर्ते नाराज झाले. पण मी त्यांना धीर दिला. मी राजकारणात कुठल्या सक्रिय पदावर नाही. त्यामुळे मी समाजकारणात आहे. एखादी एनजीओ चालवणारी व्यक्ती जितकी सक्रिय समाजकारणात असते. तितकी मी आहे.'', असे पंकजा यांनी म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या संकटात महाराष्ट्र सरकारविरुद्ध भाजपाने केलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याबाबत पंकजा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, मी सध्या समाजकारणात आहे, त्यामुळे मी आंदोलनात नव्हते, असे उत्तर पंकजा यांनी दिलंय. 

दरम्यान, पंकजा मुंडेंना बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र लिहून ३ जून रोजी परळीतील कार्यक्रमासाठी आखलेला बीड दौरा रद्द करण्याची विनंती केल्याचे पंकजा यांनी सांगितले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली, पण #Lockdown होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. कारण, मी जरी लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, त्याठिकाणी स्थानिक व इतर जिल्हयातील लोकं मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल, नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे #covid19 च्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा. त्यामुळे मी परळीचा दौरा रद्द करत असल्याचं पंकजा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपागोपीनाथ मुंडेकोरोना वायरस बातम्या