मित्र, नातेवाइकांची ‘ती’ फाइल तुम्हालाही आली का?; थेट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एन्ट्री
By मनीषा म्हात्रे | Updated: July 31, 2025 10:11 IST2025-07-31T10:11:52+5:302025-07-31T10:11:52+5:30
सायबर भामट्यांचा नवा फंडा; कुतूहलापोटी फाइल उघडणे पडू शकते महागात

मित्र, नातेवाइकांची ‘ती’ फाइल तुम्हालाही आली का?; थेट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एन्ट्री
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : फसव्या आणि एपीके फाईल जोडलेल्या ई-चलानद्वारे सायबर भामट्यांनी चक्क पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये प्रवेश करत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला तब्बल साडेसात लाखांना गंडवले. सायबर भामट्यांनी अशाच प्रकारे एपीके फाईलद्वारे खाते हॅक करत मित्र, नातेवाईकांसह व्यावसायिक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रवेश करत फसवणूक सुरू केल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे ग्रुपवर आलेली अनोळखी लिंक आणि एपीके फाईलवर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ट्रॉम्बे पोलिसांच्या प्रकरणात पोलिसाने हे फसवे चलान उघडताच त्याच्या खात्यावर सुमारे ७.५० लाखांची कर्ज रक्कम जमा झाल्याचा मेसेज बँकेने पाठवला. पुढे दोन व्यवहारांद्वारे ही रक्कम अन्य अनोळखी खात्यांवर वळती केली. ती फाईल शेअर करणाऱ्याचेही अकाउंट हॅक झाल्याचे चौकशीत समोर आले होते. सायबर भामटे अशाच प्रकारे व्हॉट्सॲप हॅक करत एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटचा ताबा घेतल्यानंतर त्याच्या नावे मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी आणि व्यावसायिक ग्रुपमध्ये एपीके फाईल शेअर करतात.
फाईलवर क्लिक केल्यावर भामटे आर्थिक फसवणूक करत आहेत. काही वेळेस बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कंपन्यांकडून सीमकार्डही मिळवले जाते. यामुळे मूळ ग्राहकाचे सीम बंद होते, आणि ओटीपी हे थेट फसवणूक करणाऱ्याच्या नव्या सीमवर येते. ओटीपी वापरून बँक खाते रिकामे केल जाते.
पत्रकाराच्या ग्रुपमध्येही एन्ट्री
गेल्या आठवड्यात अशीच घटना नुकतीच नवी मुंबईतही घडली. एका प्रसिद्ध पत्रकाराच्या ग्रुपमध्ये देखील अशीच एपीके फाईल पाठवण्यात आली होती. संबंधित पत्रकाराचा व्हॉट्सॲप आधीच हॅक झाल्याचे नंतर समोर आले. त्यामुळे मित्र, सहकारी किंवा नातेवाईकाने ग्रुपवर पाठवलेली फाईल कुतूहलापोटी उघडणे महागात पडू शकते. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.
अशी टाळा फसवणूक
कुठलीही एपीके फाईलसह अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बँक अकाऊंटला एसएमएसशिवाय ई-मेल अलर्ट कार्यान्वित करावे. सीमकार्ड बंद झाल्यास संबंधित बँकेला त्याचा अकाऊंटशी असलेला संबंध तोडण्यास कळवावे. विशेषतः सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा सलग सुट्ट्यांच्यावेळी या घटना घडतात. त्यामुळे मोबाइल गॅलरी व बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संपर्क करण्यात अडथळा येतो. अशावेळी कस्टमर केअर यांच्याशी संपर्क साधून वेगाने पावले उचलण्याची गरज आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (दुहेरी पडताळणी) कार्यान्वित करा. हे आपल्या सोशल मीडिया खात्यांमध्ये अनोळखी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करू शकते.