विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:13 IST2025-10-13T14:13:01+5:302025-10-13T14:13:01+5:30
पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते.

विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम
जयंत होवाळ -
मुंबई : विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणारा नवा पूल तीन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला खरा; परंतु या पुलामुळे कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील रहिवाशांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. विक्रोळी पूर्वेला जिथे हा पूल संपतो, त्या ठिकाणी नियोजन चुकले आहे का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते.
‘एलबीएस’वर जाण्यासाठी हे दोनच पर्याय होते. पूर्व द्रुतगती महामार्गावरून ‘एलबीएस’वर जाण्यासाठी आणखी एक पर्याय असावा, यासाठी विक्रोळी पूर्व-पश्चिम पूल बांधला.
या पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ‘एलबीएस’ हे अंतर एकदम टप्प्यात आले. मात्र, हा पूल अगदीच महामार्गाला खेटून संपत आहे. परिणामी तेथे वाहनांची कोंडी होत आहे.
कन्नमवारनगरमधून येणारी वाहने टागोर नगरला जाण्यासाठी पुलाच्या टोकापासून उजवे वळण घेतात, त्याचवेळी पुलावरूनही वाहने येत असतात. त्यामुळे दोन्ही वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून उजवीकडे जाणारे वळणच वाहतूक पोलिसांनी बंद केले.
पूर्व द्रुतगती महामार्ग आणि या पुलाच्या शेवटचे टोक यात फार अंतर नसल्याने पुलावरून महामार्गाच्या दिशेने येणारी वाहने आणि टागोरनगर येथून येणारी वाहने यांच्यात गोंधळ उडत आहे.
परिणामी कन्नमवार नगरमधून टागोर नगरला जायचे झाल्यास थेट विक्रोळी स्थानकापर्यंत जावे लागते आणि तिथून ‘यु-टर्न’ घेऊन पुन्हा टागोर नगरच्या दिशेने जावे लागते. साहजिकच प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाढत आहे. ही कोंडी दूर करण्याचा मोठा पेच असून, अजूनही तो सुटलेला नाही.
पूर्व द्रुतगती महामार्गालगत लगत असलेल्या शिल्पाची जागा बदलण्याचा विचार सुरू आहे. ती जागा बदलल्यास मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघू शकतो.