Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ‘धारावी पॅटर्न’ पुन्हा ठरला बेस्ट; दिवसभरात शून्य काेराेना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:26 IST

दुसरी लाट; चार महिन्यांत पहिल्यांदाच आढळला नाही एकही बाधित 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’च बेस्ट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. दुसऱ्या लाटेत काेराेनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदा सोमवारी धारावीत एकही बाधित  रुग्ण आढळला नाही. यापूर्वी सहावेळा येथे शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या येथे केवळ १३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सहा घरी उपचार घेत आहेत, तर चार रुग्णालयांत आणि तीन रुग्ण काेराेना काळजी केंद्र दाेन येथे आहेत.

दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या धारावीत एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने येथे संसर्ग रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे होते. मात्र, यातूनच तयार झालेल्या ‘धारावी पॅटर्न’ने आपली कमाल दाखविली. मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना धारावीत मात्र संसर्गाची साखळी तुटली.दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी माध्यान्हापासून मुंबईत कोरोना पुन्हा वाढू लागला. धारावीसमोरही नव्याने आव्हान उभे राहिले. यावेळेस चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्णवाढ अधिक होती. त्यामुळे पुन्हा ‘धारावी पॅटर्न’ राबविण्यास सुरुवात झाली. जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, तत्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार सुरू करण्यात आले. परिणामी, धारावी पुन्हा कोरोनामुक्त होण्याचा मार्गावर आहे.यापूर्वी जानेवारी महिन्यात २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारी राेजी धारावीत शून्य रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर, दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढून ३ मे रोजी सर्वाधिक ९४ बाधित रुग्ण आढळून आले होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस