धारावी परिसराला क्षयरोगाचा विळखा; केंद्राच्या तपासणी मोहिमेत माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:03 IST2025-03-22T15:02:17+5:302025-03-22T15:03:10+5:30
केंद्र सरकारने देशभरात क्षयरोगाविरोधात ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ दरम्यान १०० दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

धारावी परिसराला क्षयरोगाचा विळखा; केंद्राच्या तपासणी मोहिमेत माहिती उघड
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा घट होत आहे. क्षयरोगाच्या दृष्टीने चार धोकादायक वॉर्ड महापालिकेने यापूर्वीच निश्चित केले होते. त्यात एम-पूर्व (गोवंडी), पी- उत्तर (मालाड), एन (घाटकोपर), जी-उत्तर (दादर, माटुंगा, ९० टक्के धारावी) चा परिसर येत असून, तेथे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात.
केंद्र सरकारने देशभरात क्षयरोगाविरोधात ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ दरम्यान १०० दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे.
मुंबईतील २४ वॉर्डांमध्येही ही मोहीम राबवली जात आहे. महापालिकेकडील माहितीनुसार, मुंबईत दरवर्षी ६० हजारांहून अधिक नवे क्षय रोगाचे रुग्ण आढळतात. त्याचबरोबर ४ ते ५ हजार औषध-प्रतिरोधक क्षय रोगाची (डीआरटीबी) प्रकरणे नोंदवली जातात. तर, जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान राज्यात १० हजार औषध - प्रतिरोधक क्षय रोगाची (डीआरटीबी) प्रकरणांची मागणी नोंद झाली.
धारावीत क्षयरोग का ?
धारावीत दाटीवाटीची वस्ती आहे. तेथे वैद्यकीय उपचार नीट होत नाहीत. सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार केले जातात. मात्र, झोपडपट्टीतील लोकांना आपली ओळख उघड होण्याची भीती वाटत असल्याने ते तिथे उपचार घेत नाहीत.
इतर आजारांचेही रुग्ण
केवळ क्षयरोगच नाही, तर अनेक इतर आजारांचे रुग्ण येथे आढळतात. अपुरे पोषणमूल्य असलेला आहार रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतो. त्यामुळे लोक संसर्गांना बळी पडतात. त्यामुळे धारावीत सर्वाधिक प्रमाणात विषाणूजन्य संसर्ग आढळतो.
क्षयरोग हा तिथे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे त्वचेेसंबंधी आजार दिसून येतात. अपुरा आहार आणि ताज्या हवेच्या अभावामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका असतो, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
पूर्ण उपचारास टाळाटाळ
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने प्रकाशित केलेल्या आणि महापालिकेसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या अहवालानुसार धारावीत दरवर्षी सुमारे ३०० लोक औषधांना प्रतिरोध करणाऱ्या क्षयरोग पॉझिटिव्ह आढळतात. या रुग्णांपैकी निम्म्याहूनही कमी रुग्ण पूर्ण उपचार घेतात.
२०१९ मध्ये धारावीत २६५, मे २०२० ते सप्टेंबर २०२२ दरम्यान एक हजार सात लोक औषध - प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारासाठी नोंदवले गेले. जानेवारी २०२३ पर्यंत ५२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५३६ रुग्ण उपचार घेत होते.