Join us

काल सूचक ट्विट अन् आज अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; तुम्ही ऐकलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 22:52 IST

आज अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी आज त्यांचं नवीन गाणं रिलीज केले आहे. अमृता फडणवीस त्यांच्या युनिक आवाजामुळे चांगल्याच चर्चेत असतात. Manike Mage Hithe या गाण्याचं हिंदी वर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.  विशेष म्हणजे गुरुवारीच अमृता फडणवीसांनी आओ कुछ तुफानी करते है, कल शाम, मी पुन्हा येत आहे असं म्हटलं होतं. त्यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं.

त्यानंतर आज अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मलिक फडणवीस वादावर अमृता काय भाष्य करतात का? अशी चर्चा सुरु होती. परंतु अमृता फडणवीसांनी राजकीय वादातून बाहेर पडत शांत राहण्यासाठी हे गाणं तयार केले. सध्या सोशल मीडियात गाजत असलेलं सर्वात हिट गाणं Manike Mage Hithe या गाण्यावर अमृता फडणवीस यांनी ताल धरला आहे. त्यात Anniversary Special असाही उल्लेख करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांनी या गाण्यात रॅपदेखील गायलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या की, बोलण्यासारखं खूप आहे परंतु योग्य वेळी बोलेन. स्पेशल म्हणजे हे गाणं देव यांनी लिहिलं आहे. ते नवीन आहेत. लवकरच तुमच्यासमोर येतील असं अमृता फडणवीस म्हणाल्या. पण हे गाणं देवेंद्र फडणवीसांनी लिहिल्याची चर्चा आहे. त्यावर अमृता फडणवीसांनी हसत हसत नो कमेंट म्हणत उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर नवीन गाणं शेअर केलं आहे.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. अलीकडेच दिपावली निमित्त अमृता फडणवीस या एक नवं गाणं घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या होत्या. आपल्या विविध सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं होतं. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमची झलक पाहायला मिळाली. दिपावलीनिमित्त महालक्ष्मीची आरती घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या होत्या.

टॅग्स :अमृता फडणवीस