Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवा'च्या इच्छेने मुंबईचा महापौर; 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:43 IST

देवाची इच्छा असल्यास मुंबईत आपलाच महापौर होईल : उद्धव ठाकरेमहायुतीचा महापौर करण्याचे वरच्या देवाने ठरवले आहे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'देवा'ची इच्छा असल्यास मुंबईत आपलाच महापौर होईल, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा, हीच देवाची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एकीकडे अशी विधाने समोर येतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत 'कहानी मे ट्रिस्ट' येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे

उद्धवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक शनिवारी उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी, देवाची इच्छा असेल, तर महापौर आमचा होईल, ते माझे स्वप्न आहे. देवाची इच्छा असेल, तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. देवाची म्हणजे मेवाची नाही, थोडा फरक आहे; देवाची म्हणजे भगवानाची इच्छा असेल, तर आपला महापौर बसेल, असे म्हटले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मुंबईत महायुतीला विक्रमी जनादेश आहे. महापौर महायुतीचाच व्हावा हीच देवाची, जनतेचीही अपेक्षा आहे आणि तसेच होईल. मी आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून त्याबाबतचा निर्णय घेऊ.

मुख्यमंत्री दावोसला रवाना 

मुख्यमंत्री फडणवीस हे गुंतवणूक परिषदेसाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर दावोसला रवाना झाले. ते चार दिवस तिकडे असतील. त्यामुळे महापौर पदाबाबत या काळात काही हालचाली होण्याची शक्यता नाही. महापौर पदाचे आरक्षणही अजून निघायचे आहे. त्यामुळे महापौरपदाबाबत हालचालींना अजून एक आठवडा तरी वेग येण्याची शक्यता नाही.

ठाकरेंचे विधान अन् शिंदे सावध

 उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेत, मुंबईतील आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. शिंदे यांनी तसे का केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नगरसेवक फुटू नयेत, म्हणून ही कृती असल्याचे म्हटले जाते. त्याच वेळी महापौर आणि अन्य पदांबाबत भाजपवर दबाव आणण्यासाठीही ही खेळी असल्याचे बोलले जाते. हॉटेलमध्ये ठेवलेले जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यात आमचे किती आहेत? पक्ष फोडणाऱ्यांनाच आपले लोक फुटण्याची भीती वाटत आहे. फोडून आलेली माणसे टिकवण्याचे टेन्शन आले असेल. कदाचित त्यांना भाजपची भीती वाटत असेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळात फडणवीसांकडून अजित पवारांचेही अभिनंदन

 सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीतील दमदार यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर, मुख्यमंत्री म्हणाले की, माझे एकट्याचे नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही अभिनंदन करा. त्यानुसार, सर्व मंत्र्यांनी तिघांचेही अभिनंदन केले. आजच्या बैठकीला एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही हजर नव्हते, पण त्यांचे मंत्री हजर होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Mayor's Race: Divine Will or Hotel Politics at Play?

Web Summary : Political maneuvering heats up as leaders invoke divine will regarding Mumbai's mayoral election. Shinde's strategic move to house corporators in a hotel sparks speculation about preventing defections and pressuring BJP amidst post-election negotiations and power dynamics.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे