Join us  

घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 9:19 PM

महाविकास आघाडीचे सरकार येताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली आहे. भाजपसाेबत अडीच वर्षाच्या मुख्यंमत्री पदावरुन झालेल्या वादानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससाेबत आघाडी करत सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावे अशी सर्वच नेत्यांची इच्छा हाेती. आजच्या शपथविधी आधी महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या किमान समान कार्यक्रमातील आश्वासने सांगितली. शपथविधीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ट्विटरवरुन या आघाडीवर निशाणा साधला आहे. 

महाविकास आघाडीने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक आश्वासने दिली. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर प्रश्नांचा उल्लेख हाेता. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीका करताना फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ''महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!''

अजित पवार यांनी सादर केलेल्या आमदारांच्या पत्राच्या पाठींब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हाेती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु अवघ्या 79 तासामध्ये फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता फडणवीस हे विराेधी बाकावर बसणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार येताच फडणवीस यांनी ट्विट करत पहिली टीका या सरकारवर केली आहे. 

दरम्यान शपथविधी हाेताच सह्याद्री अतिथीगृहावर सर्व कॅबिनेट नेत्यांची बैठक बाेलविण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा हाेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस