नव्या वर्षात विकास प्रकल्प वेगात; पाणीप्रश्न, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:38 IST2026-01-01T14:37:47+5:302026-01-01T14:38:13+5:30
पाणीप्रश्न, रस्ते काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या वर्षात विकास प्रकल्प वेगात; पाणीप्रश्न, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागणार
मुंबई : महापालिकेत जवळपास चार वर्षांपासून असलेले प्रशासकीय राज अखेर नवीन वर्षात संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट स्थापन होणार आहे. महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून, निकाल काय लागतो आणि महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाणीप्रश्न, रस्ते काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रशासक राजवट असतानाही अनेक नवीन प्रकल्प आणि विकासकामांची सुरुवात २०२५ मध्ये झाली. कोस्टल रोडच्या वर्सोवा-भाईंदर टप्प्याला गती मिळाली. ‘खड्डेमुक्त मुंबई’साठी महापालिकेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले. आतापर्यंत हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. नववर्षात या दोन्ही प्रकल्पांना बूस्ट मिळणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांतून सुटका होईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
स्वच्छ हवेची अपेक्षा
वाढत्या बांधकामामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले. परिणामी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२५ मोठ्या प्रकल्पांना तसेच वांद्रे-कुर्ला संकुल येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कामालाही काम बंदची नोटीस बजावण्याचे धाडस महापालिकेने दाखवले. नवीन वर्षातही महापालिका प्रशासनाने वायुप्रदूषण नियंत्रणावर अधिक भर देणार असून, मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
धरणाच्या बांधकामाला सुरुवात
पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी गारगाई धरणाला अखेर १० वर्षांनंतर हिरवा कंदील मिळाला. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, बांधकामाला नवीन वर्षात सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीसाठ्यात दररोज ४४० दशलक्ष लिटरने वाढ होणार आहे. मनोरी येथील खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्याच्या प्रकल्प बांधकामाची सुरुवातही नवीन वर्षात होईल.
मलजल वाहिन्यांतील दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये, यासाठी पालिकेकडून सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येत आहेत. त्यापैकी वर्सोवा, घाटकोपर, भांडुप येथील एसटीपीचे काम नवीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नाहूर येथे बर्ड पार्क, राणीच्या बागेत ‘एक्झॉटिक झू’ला गती
राणीच्या बागेत नवीन प्राणी येणार आहेत. नवे पक्षी अभयारण्यही उभारण्यात येत आहे. नाहूर बर्ड पार्क आणि राणीच्या बागेतील ‘एक्झॉटिक झू’ प्रकल्पाला गती दिली जात असल्याने मनोरंजनाची नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.