एक हजार रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:48 IST2025-05-23T09:42:02+5:302025-05-23T09:48:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाइन उपस्थितीत मुंबईतील स्थानकांचे लोकार्पण

development of one thousand railway stations like an airport said devendra fadnavis | एक हजार रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा : देवेंद्र फडणवीस

एक हजार रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा : देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांचाच प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी देशभरात अत्याधुनिक रेल्वेचे जाळे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याच ‘नवभारता’च्या स्वप्नपूर्तीला नमो भारत, अमृत भारत सारख्या योजनांमुळे गती मिळत असून, येत्या काही वर्षांत अशाच योजनांतून महाराष्ट्रासह देशभरात एक हजार रेल्वे स्थानकांमध्ये विमानतळाप्रमाणे सुविधा उभारण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे २,८०० कोटी खर्च करून स्वरूप बदलण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
देशभरातील १०३ अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी, २२ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यानिमित्ताने मध्य रेल्वेच्या परळ स्थानक परिसरात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा आदी उपस्थित होते.

रेल्वे विकासासाठी सहा पट खर्च : मोदी

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहिले होते. सध्या देशातील १३०० पेक्षा अधिक स्थानकांना आधुनिक बनविण्याचे काम सुरू असून, २६ हजार कोटी खर्चून उभे राहिलेले १०३ स्थानक आता सुरू होत आहेत. 

सरकारने रेल्वे सुविधा आधुनिक बनविण्यासाठी मागील दशकाच्या तुलनेत ६ पटीने जास्त खर्च केला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गेल्या अकरा वर्षांत ३४ हजार किमी रेल्वेचे जाळे उभारून जास्तीत जास्त लोकांना रेल्वेचा स्वस्त आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून दिला आहे. आता नमो भारत, अमृत भारत, एलएचबी कोच सारख्या नवीन गाड्यांमुळे रेल्वेला अत्याधुनिक स्वरूपही मिळत आहेत, असे मंत्री वैष्णव यावेळी म्हणाले.

परळसह चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाडसह मुंबई विभागातील १२ स्थानकांचे यावेळी लोकार्पण झाले. त्यासाठी अमृत भारत योजनेंतर्गत १५ महिन्यांत १३८ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

 

Web Title: development of one thousand railway stations like an airport said devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.