Despite the change of political power, Adv. Ashutosh Kumbakoni's appointment is still | सत्ताबदलानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती कायम
सत्ताबदलानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती कायम

ठळक मुद्देअधिसूचना ७ डिसेंबर रोजी राज्य सरकारने काढली व त्यावर मेहता यांची सही आहे. २००५ पासून अ‍ॅड. कुंभकोणी यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे सहाय्यक महाअधिवक्ता म्हणून कामकाज सांभाळले आहे.

मुंबई - राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष अरविंद कुंभकोणी यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. यासंदर्भात ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सही केली आहे. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची भाजप सरकारने ७ जून २०१७ रोजी राज्याच्या महाअधिवक्तापदी नियुक्ती केली. या पदावर अ‍ॅड. कुंभकोणी यांना कायम करण्यात येत आहे, अशी अधिसूचना ७ डिसेंबर रोजी राज्य सरकारने काढली व त्यावर मेहता यांची सही आहे.

माजी महाअधिवक्ता रोहीत देव यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २०१७ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. कुंभकोणी यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती केली. १२ जुलै १९५६ रोजी कुंभकोणी यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंबच वकिली व्यवसायात आहेत. २००५ पासून अ‍ॅड. कुंभकोणी यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे सहाय्यक महाअधिवक्ता म्हणून कामकाज सांभाळले आहे.
२००८ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सेवा ज्येष्ठतेच्या मुद्यावरून वाद निर्माण झाल्याने त्यांनी सहा महिन्यांतच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला.

Web Title: Despite the change of political power, Adv. Ashutosh Kumbakoni's appointment is still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.