Join us

देशमुख, मलिक अन् आता परब, महाविकास आघाडीला तिसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:12 IST

महाविकास आघाडी सरकारला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आधीच तुरुंगात असताना आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे टाकल्याने महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. 

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. कुविख्यात दाऊदच्या निकटवर्तीयांशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात मंत्री नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरही सोमय्या यांनी घोटाळ्यांचे आरोप केले होते. 

मुंबई महापालिका निवडणूक ४ महिन्यांवर आली असताना सत्तारूढ शिवसेनेला परब यांच्यावरील कारवाईने धक्का बसला आहे. महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आ. यामिनी जाधव आधीच ईडीच्या रडारवर आहेत. परब मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जातात. अशा वेळी परब यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणे हे शिवसेनेची डोकेदुखी वाढविणारे आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर अलीकडेच छापे टाकले होते आणि त्यांची काही संपत्तीदेखील जप्त करण्यात आली होती.  

टॅग्स :महाविकास आघाडीशिवसेनाअनिल परब