Join us  

उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाची आत्महत्या; 2 महिन्यापूर्वीच दिला होता राजीनामा

By मनीषा म्हात्रे | Published: February 21, 2023 7:16 PM

उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाने आत्महत्या केली आहे. 

मुंबई: उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाने मंगळवारी राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी  घेत आयुष्य संपविल्याने खळबळ उडाली आहे. कामाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तापसातून समोर येत आहे. दोन महिन्यापूर्वीच त्यांनी कामाचा राजीनामाही दिला होता. विमलेश कुमार बनारसीदास ओदित्य (५९) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.

टिळकनगर येथील तारा हाऊस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर विमलेश कुमार हे कुटुंबियांसोबत राहण्यास होते. मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांनी, दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांकडे चौकशी केली. तेव्हा, त्यांची पत्नी रमा औदित्या यांच्याकडे विचारणा केली. पत्नीने पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलेश कुमार यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ते उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यावरण खात्यामध्ये कामास होते. त्यांचे कार्यालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर, गेल्या वर्षभरापासून लखनऊ येथील मुख्य कार्यालयात डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करत होते. मात्र कामाचा ताण आणि घरापासून दूर राहावे लागत असल्याने त्यांनी दोन महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता. मात्र पर्यावरण विभागाकडून त्यांना ३१ मार्च पर्यंत काम करण्यास सांगितले होते. याच, कामाच्या तणावातून त्यांनी उडी मारल्याचे सांगितले.

प्राथमिक शवविच्छेदनाच्या अहवालातही उंचावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीकडूनही कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले असले तरी अधिक तपास सुरु असल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले आहे. 

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमृत्यूउत्तर प्रदेश