Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 06:00 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंना दालन आहे पण कार्यालय नाही, अशी अवस्था बघायला मिळाली.  

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दालन विधानभवनच्या तळमजल्यावर आहे. त्याच्या बाजूला एक कक्ष आहे तिथे त्यांचे प्रधान सचिव नवीन सोना हे बसतात.  गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र मोठे दालन पहिल्या माळ्यावर होते. तेथे त्यांचे पीएस, ओएसडी, जनसंपर्क अधिकारी, सहसचिव, उपसचिव बसायचे. आता त्यांना बसायला जागा नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना मंत्रालयात बसावे लागले.

शिंदे यांचा स्टाफ पहिल्या माळ्यावरील ज्या दालनात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बसत होता ते दालन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मुळात देण्यात आले होते; पण गेल्या अधिवेशनात तेथे शिंदेंच्या स्टाफला तात्पुरती जागा देण्यात आली होती. ते मोठे दालन आता अंबादास दानवे यांनी घेतले आहे आणि त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झेरॉक्स कॉपी काढायचीही सोय नाही, अशी अवस्था आहे.

८ दिवसांपूर्वी शिंदेंनी केली होती दालनाची मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाला आठ दिवसांपूर्वीच पत्र पाठवून माझ्या ‘स्टाफ’साठी दालन द्या अशी मागणी केली होती मात्र अजून दालन मिळालेले नाही.

 तळमजल्यावरील शिंदे यांच्या दालनाच्या जवळची दोन-तीन दालने आपल्याला मिळतील, अशी शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांपासून ही दालने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आली आहेत.

पर्यायी व्यवस्था होत नसल्याने ते ही दालने सोडायला तयार नाहीत. त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.

टॅग्स :अजित पवार