Join us  

सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:46 PM

मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न; खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित

मुंबई: सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.सारथी संस्थेला ८ कोटींची मदत उद्याच्या उद्या देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सारथी संस्था बंद केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र तसा कोणताही विचार नाही. सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येईल. तिचा कारभार पारदर्शक असेल, अशी मला आशा आहे, असं अजित पवार म्हणाले. सारथी संस्थेच्या समोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी जातीनं लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या दोन बैठकांचे समाज बांधवांनी वेगळे अर्थ काढू नयेत, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. अजित पवार यांना आजच्या आज निर्णय घ्यायचा असल्यानं त्यांनी मला त्यांच्या दालनात बैठकीसाठी बोलावलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सारथी संस्थेची स्वायत्तता राखण्याचं आश्वासन दिलं असून संस्थेच्या निधीची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे संस्थेला निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. 'सारथी संस्था म्हणजे शाहू महाराजांचं जीवन स्मारक आहे. त्यामुळे ही संस्था टिकायला हवी. तिची स्वायत्तता राखायला हवी. मधल्या काही महिन्यांमध्ये संस्थेबद्दलचे निर्णयच घेतले जात असल्यानं मराठा समाज दुखावला गेला होता. मात्र यापुढे असा प्रकार घडणार नाही, अशी अपेक्षा आहे,' असंदेखील ते पुढे म्हणाले.संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ'मातोश्री-2'साठी उद्धव ठाकरेंनी किती 'कॅश' दिली?; काँग्रेस नेत्याची ईडी चौकशीची मागणी

टॅग्स :अजित पवारमराठासंभाजी राजे छत्रपती