गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ठेवी वाढल्या; मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:32 IST2026-02-26T10:31:40+5:302026-02-26T10:32:28+5:30
पुढील महिन्यात आयुक्त म्हणून त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे हा त्यांचा पालिकेचा शेवटचा अर्थसंकल्प ठरेल.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ठेवी वाढल्या; मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात ८० हजार कोटींवर असलेल्या मुदतठेवी आता ८१ हजार कोटी झाल्या आहेत. उत्पन्न आणि खर्च यात तफावत झाली तरच ठेवींचा वापर केला जातो अन्यथा नाही. आम्ही अलीकडे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत ठेवी वाढल्या आहेत, याकडे आयुक्त भूषण गगराणी यांनी लक्ष वेधले.
आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्तांनी गेल्यावर्षी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. पालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थायी समितीला त्यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. पुढील महिन्यात आयुक्त म्हणून त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे हा त्यांचा पालिकेचा शेवटचा अर्थसंकल्प ठरेल.
महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे गगराणी हे सुमारे चार वर्ष प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार पहात होते. त्यावेळी ठेवी, खर्च आणि महसूल यावर त्यांनी विवेचन केले. मागील काही वर्षाची आणि या वर्षाची आकडेवारी पाहिली असता मुदत ठेवीची रक्कम वाढली आहे, असा दावा त्यांनी केला. महसुलात वाढ झाली, तर ठेवींना हात लावण्याची आवश्यकता भासत नाही, असेही ते म्हणाले.
तब्बल अडीच तास वाचन
दुपारी दोन वाजता आयुक्तांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. तब्बल अडीच तास म्हणजे साडेचार वाजेपर्यंत ते वाचन करत होते. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे एवढ्या प्रदीर्घकाळ वाचन हे पहिल्यांदाच झाले असावे. तब्बल ९२ पाने आयुक्तांनी वाचून दाखवली. विशेष म्हणजे वाचन झाल्यानंतर थोड्याच अवधीत आयुक्त पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहिले.
मुदत ठेवी ८१,४४९ कोटींवर; गतवर्षीपेक्षा ३२५ कोटींची घट
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीमध्ये मागील काही वर्षापासून सातत्याने घट होताना दिसून येत असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात त्यात नेमकी किती घट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुदत ठेवीमध्ये अवघ्या ३२५ कोटींची घट दिसून आली. यंदाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे सध्या मुंबई महापालिकेच्या ठेवी या ८१ हजार ४४९ कोटी इतक्या आहेत.
मागील वर्षी त्या ८१ हजार ७७४ कोटी होत्या
वर्ष २०२१-२२ साली ९१ हजार कोटींच्या मुदत ठेवी असलेल्या मुंबई पालिकेच्या ठेवी २०२४-२५ मध्ये ८१ हजार ७७४ कोटींवर आल्या. मागील काही वर्षात पालिकेने पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले. या प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीच्या जबाबदारीसाठी पालिकेच्या मुदतठेवी झपाट्याने कमी होऊ लागल्याचे सांगण्यात आले.

पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. त्या ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. याबाबत पालिका सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुदत ठेवींची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या प्रकल्पासाठी संलग्नित निधी
सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प असे मोठ्या खर्चाचे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्प यांच्यासाठी लागणारा निधी हा मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदतठेवी कमी होत जातात. पालिकेने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली आहे.
