भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत मांडले विदारक चित्र
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 1, 2025 20:01 IST2025-05-01T20:00:53+5:302025-05-01T20:01:47+5:30
Banking In India: देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत परखडपणे नमूद केले.

भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत मांडले विदारक चित्र
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोनशे पस्तीस लाख कोटी रुपये कर्ज असून पाच ट्रिलियन डॉलरचे मृगजळ दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात देशाची आर्थिक परिस्थिती अतीशय भयानक आहे. देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत परखडपणे नमूद केले.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिवंगत विजय वैद्य यांनी ४२ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४३ व्या वर्षी हिरीरीने आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेची सांगता विश्वास उटगी यांच्या 'आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे कां?' या विषयावरील व्याख्यानाने झाली.विजय वैद्य, दिनू रणदिवे यांच्यावेळची पत्रकारिता आज राहिलेली नाही, अशी खंतही व्यक्त केली.
सुमारे दोन तास त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षातील अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे चढ उतार समजावून सांगतांना सहकारी बॅंका केंद्र सरकारने तसेच रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयांमुळे कशा डबघाईस आल्या, कशा बुडाल्या, संचालक मंडळ दोषी धरण्यात आले परंतु रिझर्व्ह बँक अधिकारी कसे बेमालूम सटकले, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसींनी कसा अर्थव्यवस्थेला चुना लावला आणि सामान्य, मध्यमवर्गीय कसा नाडला जातोय, ही संपूर्ण विदारक परिस्थिती सांगितली.
पक्ष कोणताही सत्तेवर येवो मग तो कॉंग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष या परिस्थितीला जबाबदार आहे, राजकारण महत्वाचे नाही अर्थकारण महत्त्वाचे आहे. हे अर्थकारण बिघडले तर पाच ट्रिलियन डॉलरची घोषणा निव्वळ घोषणाच राहते, मध्यमवर्गीय माणसाला बसायचा तो फटका बसतोच. दहा टक्के मूठभर लोकांच्या भल्यासाठी एकशे चाळीस कोटी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले. आपण न्यायालयात जाऊन अनेक प्रकरणी लोकांना न्याय मिळवून दिला असल्याचा दावा सुद्धा उटगी यांनी यावेळी केला.