मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन कक्षाने गोविंदासाठी सुरु केलेल्या १९१६ या हेल्पलाईनचे टी-शर्ट परिधान केलेले स्वयंसेवक दहिहंडी उत्सवाच्या दिवशी शहरात तैनात करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई महापालिकेला दिले.
दहीहंडी समन्वय समिती आणि मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, ट्राफिक पोलीस, आरटीओ, जे. जे रुग्णालय, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणांसोबत पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. पु.ल. देशपांडे कला अकादमी मध्ये झालेल्या बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, सरचिटणीस गीता झगडे, खजिनदार डेव्हिड फर्नांडिस, तुषार वावेकर, चेतन बेलकर, राजेश सानवडेकर, जितेंद्र राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश पल्लेवाड, महापालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पारडे यांच्यासह सबंधित अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
मुंबईतील दहीहंडी उत्सवाचे यशस्वी आणि सुरक्षित नियोजन करण्यासाठी उत्सव काळातील गर्दी नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था यासंबंधी सविस्तर आढावा या बैठकीत घेतला. विविध विभागांमधील समन्वय आणि दक्षता वाढवून उत्सव शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि पारंपरिक उत्साहात पार पडावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. परवानगी देताना सुलभता असावी, रुग्णालयाचे मार्गाचा मँप तयार करा असेही निर्देश दिले. पंधरा दिवसाच्या आत पुन्हा आढावा बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.