मुंबई : अटल सेतूची वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या उभारणीसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुल शुक्रवारी रात्री १० वाजता बंद करण्यात आला. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याचे पाडकाम सुरू केले. त्यासाठी जेसीपीसह अन्य यंत्रसामग्रीची मदत घेण्यात आली. या कामाला स्थानिकांचा विरोध असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. परिसरात तणावाचे वातावरण होते.
अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई आणि वांद्रे दिशेला जाता यावे यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीए उभारत येत आहे. एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे.
त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वे मार्गिकेवर एक पूल उभारला जाणार आहे. त्यावरून ही उन्नत मार्गिका जाईल. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पुलाच्या परळ आणि प्रभादेवी या दोन्ही बाजूला हा फौजफाटा तैनात होता.
काम का रखडले?
सध्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावर परळ आणि प्रभादेवी भागाला जोडणारा पूल आहे. वरळी-शिवडी मार्गिकेसाठी तो तोडावा लागणार आहे. त्याचे पाडकाम पूल बंद केल्यानंतर लगेच सुरू केले आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी एप्रिलमध्ये या पुलाचे पाडकाम करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एमएमआरडीएला परवानगी दिली होती. मात्र, स्थानिक रहिवाशांनी १९ इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याची मागणी करून पुनर्विकासाचा प्रश्न सुटेपर्यंत पुलाचे काम सुरू करू नये, असे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी पुलाचे काम रखडले होते. आता तो पुन्हा बंद करण्यात आला असून, त्याचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे.
आंदोलक रहिवाशांना नोटिसा
विरोध होऊ नये म्हणून पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वरळी-शिवडी पुलाच्या कामाला विरोध नाही. मात्र १९ इमारतींच्या समुह पुनर्विकासाबाबत निर्णय घेतल्याशिवाय पुलाचे पाडकाम करणार नसल्याचे सांगितले होते. आता याबाबत कोणताही निर्णय न घेता पुलाचे पाडकाम सुरू केले आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी दिली.