स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेला भगूर येथील वाडा सध्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र येथे प्रसाधनगृह नसल्याने साऱ्यांचीच आणि विशेषत: महिलावर्गाची गैरसोय होते. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून, स्वच्छ प्रसाधनगृह बांधावे, अशी मागणी मुंबईच्या भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी राजीव शेट्ये यांनी केली आहे. 'केल्याने देशाटन' या उक्तीला साजेसं-समर्पक असं स्वच्छ प्रसाधनगृह शासनामार्फत लवकरात लवकर बांधून एक आदर्श निर्माण करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक शहरापासून साधारण १६ किलोमीटर अंतरावर दारणेच्या कुशीत वसलेलं भगूर छोटसं गावं. एखादे गाव त्या मातीतील बलिदानाने ओळखले जाते. भगूर त्यापैकीच एक. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला तो भगूरगावी. अनेक सावरकरप्रेमी, अभ्यासू इतिहासकार, वरिष्ठ नागरिक, विदेशात स्थायिक असलेले भारतीय, पती-पत्नी कुटुंब, इतर लाखो पर्यटक नेहमीच इथे उत्सुकतेपोटी येतात. पुरातत्व खात्याकडून वाड्याचेपावित्र्य अबाधित राखून रंगरंगोटी केलेली बघायला छान वाटते. मात्र त्यात एका गोष्टीचा अभाव आढळून आला तो म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह! येथे प्रसाधनगृह उपलब्ध नाही, अशी खंत शेट्ये यांनी व्यक्त केली.
वाड्याला लागूनच पुरातत्व खातं अडीच वर्षांपासून शौचालय बांधत आहे. पण शासननिर्मित हे प्रसाधनगृह केव्हा पुरे होईल देव जाणे! नाहीतर सावरकरांची उपेक्षा जन्मजन्मांतरीची ठरेल की काय? प्रसाधनगृह नसल्याने पंचाईत होते, विशेषतः महिलांची...विदेशात या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. स्वच्छ प्रसाधनगृह बांधून सावरकरप्रेमींच्याच किंवा खात्यातर्फे काही शुल्क भरून वापरायला देण्यात यावे.जेणेकरून प्रसाधनगृह स्वच्छ तर राहीलंच, महिन्याचा त्याच्यावरील खर्चही टळेल तसेच येथे येणाऱ्या नागरिकांची सोयही होईल आणि आपलेच परदेशातील स्वकीय तिकडच्या स्मारकांशी तुलना करून, आपल्या वास्तवतेचे म्हणजेच देशाचे वाभाडे काढणं तरी बंद होईल असे मत शेट्ये यांनी व्यक्त केले.