मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर प्रवाशांना लुटले जात आहे. सोमवारी संध्याकाळी भायखळा तिकीट काउंटरवर बसलेला रेल्वे कर्मचारी योगेश नाईक प्रवाशांकडून तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा ४० ते ५० रुपये जास्त आकारत होता. हे तिकीट उत्तर भारतातील गाड्यांचे होते. हा प्रकार एका सुज्ञ प्रवाशाने कॅमेरामध्ये कैद केला असून तो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत प्रशासनाला याचा जाब विचारला आहे.
सोमवारी घडलेल्या घटनेत असलेल्या प्रवाशाने सांगितले की, प्रथम कर्मचाऱ्याने त्याला तिकीट दिले, ज्याची किंमत ३९५ रुपये होती. हे तिकीट लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते प्रयागराजपर्यंत होते; परंतु कर्मचाऱ्याने शुभम मिश्रा नावाच्या प्रवाशाकडून ४३५ रुपये मागितले. शुभमने तिकिटाचे पैसे काउंटरवर जमा केले; परंतु त्याने तिकिटाची किंमत पाहिल्यावर काउंटरवर उपस्थित असलेल्या नाईकला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर नाईक म्हणाले की, तिकीट ४३५ रुपयांचे आहे; पण त्यानंतर प्रवाशाने तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा नाईक पैसे परत केले. मात्र, प्रवाशाने पैसे परत घेतले नाहीत.
प्रकरणाची चौकशी करणारया प्रकरणाबद्दल वाणिज्य विभागाला विचारले असता, संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. शुभम मिश्रा म्हणतात की कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळतो, परंतु तरीही हे सरकारी कर्मचारी काउंटरवर बसून सामान्य आणि गरीब प्रवाशांना लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी माहीम स्थानकावरील रेल्वे तिकीट बुकिंग काउंटरवर एक बाहेरील व्यक्ती काम करताना पकडला गेला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याने रेल्वेच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासहार्यतेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.