धारावीच्या कुंभारवाड्यातील हंड्यांचा गोपाळकाल्यात डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:18 IST2025-08-16T12:18:31+5:302025-08-16T12:18:39+5:30

लहानथोरांचे हात देतात मातीला आकार; कलाकौशल्याचा देशभर बोलबाला

Demand for pots from Dharavi Kumbharwada to Gopalkala | धारावीच्या कुंभारवाड्यातील हंड्यांचा गोपाळकाल्यात डंका

धारावीच्या कुंभारवाड्यातील हंड्यांचा गोपाळकाल्यात डंका

महेश पवार 

मुंबई : धारावीतील कुंभारवाड्यात चाकावर फिरणाऱ्या मातीचा ताल, भट्टीत भाजणाऱ्या वस्तूंचा सुगंध, कारागिरांच्या हस्तकौशल्यामुळे इथल्या गल्ल्यांमध्ये उत्साहाचा नवा रंग चढला आहे. साध्या मातीच्या नाजूक कलाकुसरीने सजवलेल्या हंड्यांना राज्यभरातून मागणी येते. साधी हंडी ६० ते १०० रुपयांना, तर रंगसंगतीने नटलेली आणि कलाकुसर केलेली हंडी २०० ते ४०० रुपयांपर्यंत विकली जाते.

कुंभारवाड्यात ३ हजार घरे कुंभारकामाशी जोडलेली आहेत. प्रत्येक घरात १० ते १५ जण काम करतात. वर्षभर पणत्या, समई, मडकी, कुल्हड, पाण्याचे माठ अशा विविध वस्तू तयार होतात. पुरुष माती आणणे, भट्टीत भाजून माल तयार करणे, देखरेख मजुरांचे व्यवस्थापन करतात; तर महिला रंगरंगोटी, पॅकिंग आणि विक्रीत व्यग्र असल्याचे व्यापारी जीवराज यांनी सांगितले.

४० वर्षांपासून हंडी विक्रीच्या व्यवसायात असलेले कुंभार दिनेश वाघेला म्हणाले, माती गुजरातमधून येते. एका दिवसात मध्यम आकाराच्या १५० ते २००, तर मोठ्या आकाराच्या ४० ते ५० हंड्या तयार होतात. माती, भट्टी, मजूर व वाहतुकीचा खर्च वगळून १० ते १५ टक्के नफ्यात व्यवसाय सुरू असतो.

परंपरेची जपणूक

६२ वर्षीय परेशभाई गेली ४२ वर्षे या व्यवसायात आहेत. त्यांच्या पणजोबांनी सुरू केलेला मातीकलेचा वारसा ते आजही जिवापाड जपत आहेत.

धारावीत सध्या सर्व्हे चालू आहे; पण हा व्यवसाय टिकवण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प हवा. नाहीतर आमची परंपरा नष्ट होईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हंडीचे फिनिशिंग व कलाकुसरसाठी १३० रुपये मजुरी दिली जाते. मडके बनविण्याच्या प्रक्रियेत सुमारे १५० जण काम करतात, असे मनीषा वाघेला यांनी सांगितले.

कलाकृतीत ऊब अन् ओलावाही

१८७० मध्ये सुरू झालेला कुंभारवाडा साडेबारा एकरांवर आहे. येथील मातीच्या कलाकृतींत जिवंतपणा असल्याचे प्रजापती कुंभार समाजाचे विजय वाघेला आणि अन्वर मिम या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मातीची भांडी बनवण्याच्या व्यवसायात मराठी आणि गुजराती कुटुंबे आहेत. रंगरंगोटी, पॅकिंग आणि सजावटीची कामे अनेकदा बाहेर दिली जातात. धारावीतील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे - मनीषा वाघेला,

Web Title: Demand for pots from Dharavi Kumbharwada to Gopalkala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.