Join us  

परवडणा-या घरांची मागणी सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 4:13 PM

Affordable housing : ५३ टक्के घरांची किंमत १ कोटींपेक्षा कमी  

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या परिसरात एका महिन्यांत ५०० कोटींच्या घरांची विक्री झाली असली तरी घर विक्रीची संख्या लक्षात घेतली तर ५० लाख ते एक कोटी रुपये किंमत असलेल्या घरांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत विक्री झालेली ३१ टक्के घरे या श्रेणीतली आहेत. तर, २२ टक्के घरांची किंमत ही ५० लाखांपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

देशात बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी ५३ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील एकूण प्रकल्पांपैकी जवळपास ४० टक्के बांधकामे ही मुंबई महानगर क्षेत्रात सुरू आहेत. कोरोना संक्रमणामुळे बांधकाम क्षेत्राला लागलेले ग्रहण राज्य सरकार आणि विकासकांनी दिलेल्या सवलतींमुळे सुटू लागले आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यांत या भागातील घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांनी उच्चांक गाठला होता. या व्यवहारांचा आढावा घेतल्यास १ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांची संख्या जवळपास ५३ टक्के आहे. विक्री झालेली २८ टक्के घरे एक ते दोन कोटी रुपये किंमतीची आहेत. तर, दोन ते तीन कोटी (९ टक्के), तीन ते पाच कोटी (६ टक्के) आणि पाच कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या फक्त ४ टक्के घरांचा त्यात समावेश आहे.

पुण्यातही तोच ट्रेण्ड

मुंबई पाठोपाठ पुणे शहरांत सर्वाधिक घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. तिथेही परवडणा-या घरांच्या विक्रीची संख्या जास्त आहे. पुण्यातील घरांच्या किंमती मुंबईच्या तुलनेत जवळपास ४० टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे तिथे २५ लाखांपर्यंत कमी किंमतीची २४ टक्के आणि २५ ते ५० लाखांपर्यंतची ४२ टक्के घरे विकली गेली आहे. ५० लाख ते एक कोटी रुपये किंमतीची घरे विकली जाण्याचे प्रमाण २९ टक्के असून एक ते तीन कोटींपर्यंतच्या घरांची संख्या तीन टक्के आहे. त्यापेक्षा जास्त किंमतीचे एकही घर पुण्यात विकले गेलेले नाही.  

टॅग्स :बांधकाम उद्योगमुंबईठाणेमहाराष्ट्र