रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 06:16 IST2025-10-17T06:15:51+5:302025-10-17T06:16:05+5:30
विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांची माणुसकी

रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थ्री इडियट्स चित्रपटात जसे आमिर खानने करिना कपूरच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉलवरून प्रसूती केली होती, तसाच प्रसंग प्रत्यक्षात मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्टेशनवर मंगळवारी पहायला मिळाला. प्रवासी विकास बेद्रे याने विलेपार्ले येथील डॉ. देविका देशमुख यांना केलेल्या व्हिडिओ कॉलमुळे एका महिलेची सुरक्षित प्रसूती झाली आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिला.
गोरेगाव (पूर्व) येथील विकास बेद्रे मंगळवारी रात्री १२:४० वाजता लोकलने गोरेगावहून चर्चगेटकडे प्रवास करत होते. राम मंदिर स्टेशनजवळ एका महिलेच्या किंकाळ्या ऐकून त्यांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. महिलेला उतरवण्यास मदत केली. २० मिनिटे वैद्यकीय मदत न पोहोचल्याने विकास यांनी प्रसूतीसाठी पुढाकार घेतला. मध्यरात्री १:३० वाजता डॉ. देविका यांना व्हिडीओ कॉल केला. प्रवाशांनी दिलेल्या कपड्यांवर महिलेला झोपवून प्रसूती करण्यात आली. डॉ. -देविका यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित प्रसूती पूर्ण झाली. त्यानंतर आई अंबिका झा व बाळाला कूपर रुग्णालयात नेले.
माझी स्वतःची प्रसूती परदेशात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली होती. माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करून त्याच आठवणींनी मी त्या रात्री जागी होते. तेव्हाच विकासचा कॉल आला. कदाचित नियतीने मला त्या क्षणी जागे ठेवण्याचे ठरवले असावे.
- डॉ. देविका देशमुख, विलेपार्ले
बाळाला जन्म देण्याचा क्षण आयुष्यात कधी विसरता येणार नाही. स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा असत्या, तर आणखी चांगले झाले असते.
- विकास बेद्रे, प्रवासी, गोरेगाव