अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या कामासाठी होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या जेएनपीए बाजूकडील २१ किमी लांबीच्या मोरबे ते करंजाडे मार्गाला बसला आहे. परिणामी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीएला पोहोचण्यासाठी आणखी काही वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र, यामुळे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना ठाणे, कल्याण, भिवंडी भागातून प्रवास करावा लागणार असून, त्यातून येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ६६ हजार कोटी रुपये खर्च करून वसई येथील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली गावादरम्यान विरार ते अलिबाग कॉरिडॉर हा ९६.५ किमी लांबीचा एक्स्प्रेसवे बांधणार आहे. हा मार्ग जेएनपीए बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमटीएचएल यांना जोडला जाणार आहे. त्यातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येणारा २१ किलोमीटरचा मुंबई- दिल्ली एक्स्प्रेसवे आणि विरार-अलिबाग कॉरिडॉरमधील एकत्रित रस्ता एमएसआरडीसीकडून बांधला जाणार आहे. मात्र त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची जेएनपीएच्या दिशेने होणारी वाटचालही लांबणीवर पडली आहे.
अंतर्गत भागात कोंडी होणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचे काम वेगाने सुरू असून, महाराष्ट्रातील तलासरी ते मोरबेदरम्यानचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे या वर्षाअखेर पूर्ण करण्याचे एनएचएआयचे उद्दिष्ट आहे. मात्र पुढील वर्षात हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यावर दिल्ली आणि उत्तर भारतातून जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मोरबे येथे थांबावे लागणार आहे. त्यातून ठाण्यातील अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल.
जेएनपीए बंदराशी जोडणी २०३० मध्येच शक्य
विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या कामासाठी एमएसआरडीसीने काढलेल्या निविदा ३६ टक्के अधिक दराने आल्याने त्याचा खर्च २६ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. राज्य सरकारला हा निधी देणे शक्य नसल्याने आता हा प्रकल्प बीओटीवर उभारण्याचा विचार आहे. त्यातून यापूर्वी काढलेल्या निविदा रद्द कराव्या लागतील. बीओटीसाठी नव्याने निविदा मागविल्यास प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात पुढील वर्षीच सुरू होईल. परिणामी मोरबे ते करंजाडे या रस्त्याच्या कामाला विलंब होईल आणि दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची जेएनपीए बंदराशी जोडणी २०३० शक्य होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
...म्हणून कामासाठी एमएसआरडीसी आग्रही
विरार-अलिबाग कॉरिडॉरवर मोरबे ते करंजाडेदरम्यान सर्वाधिक अवजड वाहतूक असेल. त्यातून या भागात टोलद्वारे अधिक महसूल मिळणार आहे. त्यामुळे विरार-अलिबाग कॉरिडॉरचा खर्च भरून काढण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असेल. त्यातून एमएसआरडीसी या २१ किमीच्या मार्गाचे काम आपल्याकडेच राहील यासाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वर्षअखेरीस तलासरी ते मोरबेपर्यंतची वाहतूक सुरू होऊनही वाहनांना कल्याण-अहिल्यानगर रस्त्यावरून जेएनपीएकडे जावे लागेल. एमएसआरडीसीने या २१ किमी मार्गाची कागदपत्रे सुपुर्द केल्यास आम्ही त्याचे काम करू. त्याबाबतचे पत्र एमएसआरडीसीला एप्रिलमध्येच देण्यात आले आहे. - सुहास चिटणीस, एनएचएआयचे प्रकल्प संचालक.