Join us  

व्वा! पवारसाहेब काय लॉजिक आहे; राष्ट्रवादीच्या 'त्या' टीकेवर भाजपाने लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 2:25 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ उमेदवार उभे केले होते. या पाचही उमेदवारांचा पराभव झालेला आहे.

ठळक मुद्देआता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल हीच अपेक्षाधार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे - पवारभारतीय जनता पार्टी ही आपत्ती या पवारांच्या टीकेला भाजपाचं उत्तर

मुंबई - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'पक्षाने पुन्हा एकदा बहुमत प्राप्त करत सत्ता मिळवली आहे. एकूण ७० जागांपैकी ६२ जागा आपला मिळाल्या असून अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. मात्र दिल्ली निवडणूक निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना भाजपावर जोरदार टीका केली होती. दिल्लीचा निकाल अपेक्षित होता, लोकांनी भाजपाविरोधात मतदान केलं आहे. धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याचा टोला लगावला होता. त्यावर महाराष्ट्र भाजपानेही शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. 

याबाबत महाराष्ट्र भाजपाने ट्विट केलं आहे की, वाह पवार साहेब वाह!, ३०३ जागा जिंकणारी भाजपा ही राष्ट्रीय आपत्ती अन् ५ जागा जिंकणारी राष्ट्रवादी ही राष्ट्रीय संपत्ती! काय लॉजिक आहे. आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल हीच अपेक्षा आहे असं सांगत शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ उमेदवार उभे केले होते. या पाचही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दिल्ली अभी दूर नही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या नेत्यांचे स्वागत केले होते. आम आदमी पक्षाने फतेह सिंह, सुरेंदर सिंह यांना तिकीट नाकारत सुरेंद्र कुमार यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे बंडखोरी करुन या दोघांनी आपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून सुरेंदर सिंह निवडणूक लढवत होते. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी आपचे विरेंदर सिंह काडियान यांना २८ हजारांपेक्षा जास्त मतदान झालं तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेंदर सिंह यांना ९०४ मते पडली. 

तर गोकळपूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे फतेह सिंह यांना ४१९ मते पडली तर याठिकाणी आपचे उमेदवार सुरेंद्र कुमार यांना ८८ हजार मते मिळून विजयी झाले. बाबलपूर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार झाहिद अली यांना १०० मते, छत्तरपूर येथे राष्ट्रवादीचे राणा सुजीत सिंह १७१ मते, मुस्तफाबाद येथील उमेदवार मयूर भान यांना २८८ मते पडली आहेत.  

टॅग्स :दिल्ली निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशरद पवारआपअरविंद केजरीवाल