Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देख भाई देख'मधून निखळ हसवणारी आजी, बॉलिवूडच्या 'शम्मी आंटी'चं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:36 IST

त्यांनी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. 

मुंबई: टेलिव्हिजनवरील 'देख भाय देख' मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या नर्गिस राबडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बॉलिवूडमध्ये त्या शम्मी आंटी नावाने परिचित होत्या. त्या 89 वर्षांच्या होत्या. सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वांना समजले. शम्मी आंटी यांनी 'कुली नंबर 1', 'खुदा गवाह', 'हम', 'अर्थ', 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटातील भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यांनी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. शम्मी आंटी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. शम्मी आंटी यांचा जन्म 1931 मध्ये मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. नर्गिस राबडी हे त्यांचं मूळ नाव. त्यांची मोठी बहीण नीना (मनी) राबडी ही फॅशन डिझायनर होती. वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. निर्माते-दिग्दर्शक सुलतान अहमद यांच्यासोबत सात वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 'उस्ताद पेद्रो' (1949) चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. गायक मुकेश यांची निर्मिती असलेला 'मल्हार' हा त्यांचा सोलो हिरोईन म्हणून पहिला चित्रपट फारसा चालला नाही. मात्र दिलीप कुमार-मधुबाला यांच्यासोबत 'संगदिल'(1952) मध्ये त्या झळकल्या. त्यानंतर शम्मी आंटीचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दीर्घ प्रवास सुरु झाला.  याशिवाय, त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'देख भाई देख', 'जबान संभाल के', 'श्रीमान श्रीमती' या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चन