Join us
Daily Top 2Weekly Top 5

“अंगावर आला तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर...”; दीपाली सय्यद यांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:12 IST

दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद भाजपवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. केवळ भाजप नाही, तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही त्या हल्लाबोल करत आहेत. दीपाली सय्यद यांच्या टीकेला भाजप आणि मनसे दोन्ही पक्षांकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. पालिका निवडणुका जवळ येत चालल्यात, तसे आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल बोललात, तर पंतप्रधानांनी आठवण करून देऊ, असा टोला दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी लगावला आहे. 

किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही, अशी टीका करताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधांना आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख केला. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर दीपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेत्यांनी दीपाली सय्यद यांना धडा शिकवण्याची भाषा केली. यानंतर दीपाली सय्यद यांनी भाजपला इशारा दिला आहे.

अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ

दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, “अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ. मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र.”, असे ट्विट करत दीपाली सय्यद यांनी भाजपला ठणकावले आहे.  

टॅग्स :दीपाली सय्यदभाजपा