डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 12:52 IST2018-10-03T12:51:47+5:302018-10-03T12:52:44+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
इंदू मिल येथे तयार करण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची तब्बल 100 फुटांनी कमी करण्यात आली आहे, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या आरोपामुळे इंदू मिल येथील स्मारकावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलन केली. हे स्मारक १४ एप्रिल २0२0 पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली.
३५0 फूट उंच मूर्ती
इंदू मिल येथील स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असेल.
दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५0 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल.
हा पुतळा दोन वर्षांत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. पुतळा घडवण्याचे काम राम सुतार यांच्या नॉयडा येथील स्टुडिओमध्ये तयार करण्यात येणार असून, तिथे तयार करण्यात येणाऱ्या डिझाइनच्या आधारे चीनमध्ये पुतळ्याचा साचा बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या साच्याद्वारे डॉ. आंबेडकर यांचा ब्राँझचा पुतळा तयार करण्यात येईल. याशिवाय इंदू मिलमध्ये तयार करण्यात येणाऱ्या स्मारकामध्ये डॉ. आंबेडकरांचा २५ फूट उंचीचाही एक पुतळा असेल. तो राम सुतार यांनी याआधीच तयार केला आहे.