अवनी वाघिणीला मारण्याचा निर्णय योग्यच- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:15 IST2018-11-06T16:12:53+5:302018-11-06T16:15:52+5:30
नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे.

अवनी वाघिणीला मारण्याचा निर्णय योग्यच- मुख्यमंत्री
मुंबई- नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. अवनीला वाघिणीच्या प्रकरणात मुनगंटीवारांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली आहे. तसेच वाघिणीच्या प्रकरणात मनेका गांधींची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अवनी वाघीण शिकार प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवनीसंदर्भातला मुद्दा उपस्थित करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वाघिणीला मारताना नियम पाळला गेला नसल्याचा आरोप आता वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वनविभागाच्या पथकाने बोराटीच्या जंगलात गोळ्या घालून ठार केले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने वन विभागाच्या चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली.
मात्र वन विभागाने दिलेल्या या माहितीवर वन्यजीवप्रेमींकडून संशय व्यक्त केला जात आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला, असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत. या वाघिणीच्या मोहिमेसाठी हैदराबादहून नेमबाज शहाफत अली खान यांना पाचारण करण्यात आले होते. वाघिणीवर नेम धरण्याची परवानगी शहाफत यांना देण्यात आली होती. प्रत्यक्षात असगर अली खान याने वाघिणीला ठार मारले. याबाबतही वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. वन्यजीवप्रेमींकडून घेतलेले आक्षेप वन विभागाने फेटाळून लावले आहेत.