विक्रोळी येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:26 IST2018-06-17T01:26:51+5:302018-06-17T01:26:51+5:30

मुंबईत अपघातांचे सत्र सुरूच असून विक्रोळीत भरधाव वेगाचा आणखीन एक बळी गेल्याची घटना शुक्रवारी घडली.

Death of a youth in Vikroli | विक्रोळी येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

विक्रोळी येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत अपघातांचे सत्र सुरूच असून विक्रोळीत भरधाव वेगाचा आणखीन एक बळी गेल्याची घटना शुक्रवारी घडली. यामध्ये रोहित पांडे (२१) याचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांतील ही चौथी घटना आहे.
अंधेरी पूर्वेकडील रहिवासी असलेला विकास ठाकूर (१८) हा मित्र रोहितच्या दुचाकीवरून जोगेश्वरीच्या दिशेने निघाला. विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडने जात असताना, शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास रोहितचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या कठड्यावर आदळला. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे रोहितला मृत घोषित करण्यात आले. भरधाव वेगामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. पार्कसाइट पोलिसांनी त्याच्याच विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१३ जून - ईदच्या खरेदीसाठी मित्रांसोबत दुचाकीवरून निघालेल्या अरबाज उस्मानी (२८) याचे जे.जे. उड्डाणपुलावर नियंत्रण सुटले. या अपघातात त्याच्या मागे बसलेला मित्र इराज राजुद्दीन खान (१९) याचा मृत्यू झाला.
१४ जून - विक्रोळीत उबेर चालकाच्या भरधाव वेगामुळे तंजीला शेख (३६) या महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी उबेरचालक इंद्रजीत सिंग गुरुदयाल सिंग (५९) याला अटक केली.
१४ जून - भांडुप एल.बी.एस. रोड येथून पायी निघालेल्या विनायक केशवराम गुहे यांचा भरधाव रिक्षाच्या धडकेमुळे मृत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Death of a youth in Vikroli

टॅग्स :Accidentअपघात